(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Yellamma First Look :दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार रॉकस्टार देवी श्री प्रसाद (डीएसपी) याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट देण्यात आली आहे. २ ऑगस्ट रोजी डीएसपीच्या वाढदिवशी त्याच्या आगामी ‘येल्लम्मा’ चित्रपटातील ‘पारशी’ या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक आणि मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. या नव्या अवताराने सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रदर्शित करण्यात आलेल्या फर्स्ट लूकमध्ये डीएसपी साधा पट्टेदार शर्ट आणि काळी पँट परिधान केलेला दिसतो. त्याच्या हातात देवी येल्लम्माचा सुशोभित मुकुट असून चेहऱ्यावरील शांतता, साधेपणा आणि जमिनीशी असलेलं नातं या व्यक्तिरेखेला वेगळेपण देताना दिसतं. निर्मात्यांनी मोशन पोस्टर शेअर करत डीएसपीच्या अभिनय प्रवासाची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं, “‘येल्लम्मा’… आणि त्यात एक माणूस आहे—पारशी. जमिनीशी नाळ जोडलेल्या भूमिकेत अभिनेता डीएसपीला सादर करत आहोत. त्याचं नाव आणि हा प्रवास तुम्ही कायम लक्षात ठेवाल. आजवर त्याच्या संगीताचा उत्सव साजरा केला, आता त्याच्या अभिनयाचाही आनंद घ्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा, रॉकस्टार डीएसपी!”
‘येल्लम्मा’मधील ‘पारशी’ ही व्यक्तिरेखा डीएसपीसाठी केवळ एक भूमिका नसून त्याच्या आयुष्याशी जोडलेली भावनिक ओळख असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी त्याने पूर्व गोदावरी जिल्ह्यातील आपल्या दिवंगत वडिलांचं गाव वेदुरुपाका येथे भेट दिली. यावेळी तो देवी येल्लम्माच्या सन्मानार्थ भरवल्या जाणाऱ्या अम्मोरू जत्रेत सहभागी झाला.
या भेटीदरम्यान डीएसपीने स्थानिकांसोबत ढोल वाजवला, नृत्य केलं आणि आपल्या वडिलांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला. या अनुभवामुळेच आपण ‘येल्लम्मा’ चित्रपटासाठी होकार दिला, असं डीएसपीने सांगितलं आहे.
View this post on Instagram
त्याच्या मते, “त्या भेटीमुळेच मी ‘येल्लम्मा’साठी होकार दिला. फर्स्ट लूकमध्ये त्या अनुभवाची प्रत्येक छटा दिसून येते. ‘पारशी’ आपल्या साधेपणातच विलक्षण आहे.”
‘येल्लम्मा’मधील डीएसपीचा हा नवा अभिनय अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, याची उत्सुकता आता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.






