शाळा-कॉलेजचा सोशल मीडियावर डंका (फोटो- ai gemini)
शाळा-कॉलेजांचा सोशल मीडियावर डंका
नवीन प्रवेशांसाठी विविध उपक्रमांचे ब्रँडिंग
विविध उपक्रमांची सोशल मीडियावर प्रसिद्धी सुरू
सोनाजी गाढवे/ पुणे: यंदा प्रथमच राज्यभरातील विविध शिक्षण संस्थांनी आपल्या शाळा-कॉलेजांच्या विविध उपक्रमांची सोशल मीडियावर प्रसिद्धी सुरू केली असून, काही नामांकीत शिक्षण संस्थांच्या कल्पना लक्ष वेधून घेत आहेत. नवीन प्रवेशांसाठी विविध उपक्रमांचे ब्रँडिंग केले जात असले, तरी या निमित्ताने विविध शिक्षक सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नवीन शैक्षणिक (Career) वर्षाचा प्रारंभ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील बहुतांश शाळांची सुरुवात येत्या १५ जूनला होणार आहे; तर काही शाळा-महाविद्यालये १ जून व ८ जूनलाच सुरू झाली आहेत. मात्र, गेल्या महिन्याभरापासून अनेक शैक्षणिक संस्थांनी प्रवेशासाठी गेल्या वर्षभरात राबविलेल्या उपक्रमांचे ब्रँडिंग करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. काहींनी रील्स केल्या, तर काहींनी विविध विषय शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्या प्रसारित केल्या. काही संस्थांनी आपल्या नियंत्रणातील सर्व शाळा-महाविद्यालयांचे स्वतंत्र व्हिडिओ करून ते प्रसारित केले. काही ठरावीक शिक्षण संस्था या प्रयोगात आघाडीवर आहेत. हा प्रयोग अनेक पालकांनाही भावल्याचे व त्याचा शाळा प्रवेशांवर चांगला परिणाम झाल्याचेही दिसते आहे.
पुणे शहरातील आघाडीच्या शिक्षणसंस्था
-फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
-खडकी शिक्षण संस्था, खडकी
-झील एज्युकेशन सोसायटी, नऱ्हे
“आजच्या डिजिटल युगात शिक्षण संस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. प्रदेशातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही फर्ग्युसन महाविद्यालयची माहिती, संधी आणि वैशिष्ट्ये समजतात. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना दिशा मिळते. वाढत्या स्पर्धेच्या काळात संस्थेची ओळख, गुणवत्ता आणि उपक्रम प्रभावीपणे मांडण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.”
प्रा. डॉ. रुपाली शिंदे सांस्कृतिक विभागप्रमुख,
फर्ग्युसन महाविद्यालय ( प्राध्यापक मराठी विभाग )
आम्ही आमच्या संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयांत दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो. मात्र, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नव्हती. यंदा त्यासाठी सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांची मदत घेतल्याने शिक्षकांचा उत्साह वाढला आहे. आपण केलेल्या कामांचे कौतुक झालेले कोणाला आवडत नाही?
-गिरीश ननावरे, कलाशिक्षक खडकी शिक्षण संस्था
आमच्या संस्थेत शैक्षणिक उपक्रमांबरोबरच अनेक सांस्कृतिक, क्रीडा, कला आदी उपक्रमही सातत्याने घेतले जातात. त्याची माहिती सोशल मीडियावरून अधिक प्रभावी पद्धतीने जात असल्याने आम्ही त्याचाही आधार घेतला. याद्वारे पालकांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे आहे.
– -प्रा. श्रद्धा आदेवार,झील एज्युकेशन सोसायटी
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे बॅनर, पोस्टर बनविण्याचे व त्याद्वारे शाळाप्रवेशासाठी आवाहन करण्याचे दिवस संपले आहेत. पालकांच्या व मुलांच्याही हाती मोबाइल व पर्यायाने सोशल मीडिया सहज उपलब्ध झाल्याने शैक्षणिक संस्थांनी त्याचा आधार घेणे काही गैर नाही. त्यातून त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळतेच, शिवाय शिक्षकांनाही कॅमेऱ्यासमोर बोलण्याचे धाडस निर्माण होते.
-उत्तमकुमार इंदोरे, सोशल मीडिया अभ्यासक






