सौजन्य - सोशल मिडीया
याबाबत शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देताना विद्यार्थ्यांकडून रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात नागरिकांनी ई-मेल आणि लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या आहेत.
सध्या इयत्ता दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिकेची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तक्रारीनुसार, इंदापूर तालुक्यातील काही शाळा व महाविद्यालयांकडून दाखला व मार्कलिस्ट देताना प्रति विद्यार्थी सुमारे २०० रुपये घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही वसुली बेकायदेशीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संचालनालयाने सर्व अधिनस्त शाळा व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची कोणतीही रक्कम आकारू नये, याबाबत सूचना देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ज्या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त रक्कम घेतली असेल, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करून विद्यार्थ्यांना घेतलेली रक्कम परत करण्याबाबतही कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा? महापालिकेकडून पुढील तीन महिन्यांसाठी नियोजन सुरू
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
शासनाच्या ४ जानेवारी २०१६ रोजीच्या निर्णयानुसार शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही अवैध रक्कम वसूल करता येत नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.






