आई आणि लिव्ह-इन पार्टनर झाले हैवान; 18 महिन्यांच्या बाळाच्या बरगड्या मोडल्या, शरीरावर 51 जखमांचे निशाण, पोस्टमॉर्टममधून धक्कादायक खुलासा
अहवालात असे उघड झाले आहे की, बाळावर वारंवार आणि निर्घृणपणे शारीरिक अत्याचार करण्यात आले होते. यानंतर, बाळाची आई अखिला आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर अशकार यांना अटक करण्यात आली असून, पोलीसांकडून या प्रकरणाची जवळच्या नातेवाईकांची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी आरोपी अशकारविरुद्ध अनुसूचित जाती/जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळावर दीर्घकाळ शारीरिक अत्याचार करून नंतर त्याची हत्या करण्यात आली.
शवविच्छेदन अहवालात असे उघड झाले आहे की, त्या निष्पाप १८ महिन्यांच्या बाळाच्या शरीरावर जखमांच्या ५१ खुणा होत्या. अहवालात म्हटले आहे की, छाती आणि डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे बाळाचा मृत्यू झाला. मुलाच्या सात बरगड्या मोडल्या होत्या, त्याला अंतर्गत दुखापत झाली होती आणि कवटीच्या आत अनेक ठिकाणी रक्तस्त्राव व सूज आली होती. तपासात असे उघड झाले की, आरोपी अशकरने मुलाच्या छातीवर पाय ठेवल्यामुळे अंतर्गत अवयव आणि बरगड्यांना गंभीर इजा झाली होती.
मुलाच्या गुप्तांगावर आणि उजव्या पायाच्या तळव्यावर भाजल्याच्या खुणाही आढळल्या. या जखमा सिगारेट आणि लायटरमुळे झाल्या होत्या. या जखमांमुळे मुलावर वारंवार अत्याचार होत असल्याचे पोलिसांचे मत आहे.
मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी मुलाच्या हाताची हाडेही मोडली होती. याबद्दल अशकर आणि मुलाची आई अखिला यांची चौकशी केली असता, आईने दावा केला की मुलगा जिन्यावरून पडला होता. मात्र पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी अखिला आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर अशकर यांना अटक केली आहे.
अशकरने गुन्ह्याची कबुली दिली असून चौकशीदरम्यान, अशकरने तिरुवनंतपुरम पोलिसांना सांगितले की, तो मुलगा अखिलासोबतच्या त्याच्या नात्यात अडथळा बनला होता. हा अत्याचार हेतुपुरस्सर रचलेला कट होता की या प्रकरणात आणखी काही नवीन वळण आहे, याचा तपास पोलीस आता करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशकरने यापूर्वी आपल्या पहिल्या पत्नीला निर्घृणपणे मारहाण करून तिला शारीरिकदृष्ट्या अपंग केले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपासही अधिक तीव्र केला आहे.






