चार वर्षीय मुलाच्या मृत्यूचे गूढ उलगडले! आईच्या प्रियकराकडून हत्या; मृतदेह नाल्यात फेकून अपघाताचा बनाव
मंगळवारी सकाळी नीलकमल नाका परिसरातील एका उघड्या नाल्यात चार वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटल्याने तपासाची दिशा बदलली.
Solapur Crime: मी तुला आझाद करतोय…; पत्नीसाठी शेवटचा व्हिडीओ बनवत 38 वर्षीय पतीची आत्महत्या
तपास अधिकारी महाजन यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आला. अहवालातून हा मृत्यू अपघाती नसून मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी मुलाच्या आईचा प्रियकर जांभू शर्मा उर्फ ‘नेपाळी’ याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. सोमवारी दुपारी दारूच्या नशेत असताना त्याने मुलाला बेदम मारहाण केल्याचे सांगितले. ही घटना मुलाच्या आईसमोरच घडली होती. त्यानंतर रात्री झोपेतून उठल्यावर मुलाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जवळील नाल्यात फेकून दिल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिमुकल्यामुळे त्याला मुलाच्या आईसोबत एकांतात वेळ घालवता येत नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता. तसेच मुलगा वारंवार रडत असल्याने संतापाच्या भरात त्याने त्याला मारहाण केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी, मुलाची आई आणि मृत चिमुकला हे तिघेही बेघर असून कचरा वेचण्याचे काम करत होते. ते काशिमीरा उड्डाणपुलाखाली वास्तव्यास होते. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आणि काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.






