संग्रहित फोटो
पुणे : कंपनीतील सहकाऱ्यांशी वाद-विवाद झाल्यानंतर त्या रागातून कर्मचाऱ्यांना घेऊन जात असतानाच टेम्पो ट्रॅव्हलरला आग लावून चौघांना जीवंत जाळणाऱ्या बसचालकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी हा आदेश दिला आहे. जनार्दन निळकंठ हुंबर्डीकर (वय ५६, रा. वारजे) असे बस चालकाचे नाव आहे.
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कच्या फेज वन येथील विप्रो सर्कल येथे १९ मार्चला सकाळी पावणेआठच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला आग लागली होती. त्यात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर पाच कर्मचारी भाजून गंभीर जखमी झाले. कर्मचाऱ्यांशी सतत होणारी भांडणे आणि इतर कामे सांगत असल्याच्या रागातून हुंबर्डीकरने बसला आग लावल्याचे तपासात उघड झाले आहे.
गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक व इतर पुराव्यांची मांडणी करून सबल पुरावा गोळा करण्यात येत आहे, असे सरकारी वकील विजयसिंह जाधव आणि तपास अधिकारी हृषिकेश घाडगे यांनी न्यायालयात सांगितले. बचाव पक्षातर्फे ॲड. बाबासाहेब काशीद आणि ॲड. शिरीष पवार यांनी बाजू मांडली.
पाच लिटर क्षमतेचा कॅन जप्त
पोलीस कोठडी दरम्यान हुंबर्डीकर यांच्याकडून पाच लिटर क्षमतेचा एक कॅन आणि कापडी चिंध्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.