संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या असून, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भरधाव कारने ट्रेलरला पाठीमागून दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (४ मे) पहाटे ४ वाजताच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीत घडली आहे.
सुनीता नारायण भट (५५, विले पार्ले, मुंबई) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सौदागर देविदास गायकवाड (वय ४२), बिपीन प्रजापती (वय २७, म्हाळुंगे, पुणे), एम डी नईम अकबर (वय ५३, नालंदा बिहार), प्रतिक सरवदे (भोसरी, पुणे) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत ट्रेलर चालक प्रविण धन्ना सिंग (२८, बेवार, अजमेर, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक प्रतिक सरवदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण सिंग त्यांचा ट्रेलर (जीजे २७ टीएफ ९६०७) घेऊन मुंबई येथून पुण्याच्या दिशेने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने जात होते. ओझर्डे गावच्या हद्दीत आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या एर्टिगा कारने (एमएच १२ झेडई ५१०२) ट्रेलरला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात सुनिता भट यांचा मृत्यू झाला, तर सौदागर गायकवाड, बिपीन प्रजापती, एम डी नईम अकबर हे गंभीर जखमी झाले आहेत. गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शिरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले
गेल्या काही दिवसाखाली मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीना जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात एका दुचाकीवरील दोघांचा जागीच मूत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील एका महिलेसह दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रविंद्र गोपाळ काकडे (वय ६५) आणि महेद्र संपत काकडे( वय ५३, दोघेही रा. पांगारे ता. पुरंदर) अशी अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर तुकाराम जयवंत पोमण (वय ६०) आणि सुरेखा तुकाराम पोमण (वय ५०, दोघेही रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे पती पत्नी गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी कारचालक अक्षय सुहास परख ( वय ३०, रा. अँमेनोरा हडपसर पुणे. मुळ रा. नेहापुजा कोऑपरेटीव्ह सोसायटी मिटानगर, गोरेगाव वेस्ट मुबई) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजाराम काकडे (वय ४०, रा पांगारे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.






