संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यासह देशभरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एक संतापजक घटना घडली आहे. एका १२ वर्षीय मुलीचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करून तिचा विनयभंग केला. तसेच धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला आहे.
विपुल विश्वकर्मा (वय १९, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे), कोझी कॅफेचे चालक यांच्यासह एका १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित १२ वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी ३ जून २०२६ रोजी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित १७ वर्षीय मुलाने पीडित १२ वर्षीय मुलीसाेबत मैत्री केली. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान अल्पवयीन मुलाने विविध प्रकारे धमकावले. तुझी बदनामी करेल, तुला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी देऊन पीडितेकडून काही खासगी माहिती आणि फोटो सोशल मीडियावरून मिळवले. त्यानंतर हे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करून पीडितेचा विनयभंग केला.
दरम्यान, पीडित मुलीने अल्पवयीन मुलाला फोटो पाठवले होते. ते फोटो सर्वांना पाठवण्याची धमकी आरोपींनी दिली. त्याआधारे तिला धमकावत तिच्यावर १० आणि १४ मे रोजी जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले. कॅफे चालकाने त्याच्या कॅफेमध्ये अशा प्रकारांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी कॅफेचालक आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड पोलीस अॅक्शन मोडवर; तब्बल 45 गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई






