संग्रहित फोटो
पुणे : विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार जणांच्या टोळक्याने मोठा राडा घालत दोन तरुणांवर वार केले अन् नंतर परिसरात हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मात्र, तिघे अद्यापही फरार आहेत. शोएब रशीद कुरेशी (वय २६, रा. पंचशीलनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात ३२ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गन्हा नोंद केला आहे. हा प्रकार येथील पंचशीलनगर येथील दयावान समाज मंदिराजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांचे मित्र हे येथील चौकात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी हातात हत्यारे घेऊन त्याठिकाणी आले. ते गोंधळ घालत होते. तेव्हा तक्रारदारांचा मित्राने त्यांना आरडाओरडा करू नका असे सांगितले. या गोष्टीचा राग आरोपींना आला. त्यांनी थेट तक्रारदार यांच्या मित्रावर हल्ला केला. त्याच्या डोक्यात वार करण्यास सुरूवात केले. त्यावेळी तक्रारदार तरुण मध्ये आले असता आरोपींनी त्याच्यावरही हल्ला केला. नंतर आरोपींनी परिसरत गोंधळ घालत हत्यारे हवेत फिरवून या भागात मोठी दहशत माजवली. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरत दहशतीचे वातावरण पसरले होते. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.
रिक्षाचालक तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटले
बिबवेवाडीतील अप्पर डेपो परिसरात रिक्षाचालक तरुणाला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शस्त्राच्या धाकाने तरुणाकडील मोबाईल, रोकड आणि रिक्षा घेऊन चोरटे पसार झाले आहेत. दोन दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्याला बेदम मारहाण देखील केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात सिद्धेश्वर मुंढे (वय १९, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, चार अनळखी चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण रिक्षा चालक असून, बिबवेवाडी तसेच आंबेगाव व कात्रज परिसरात प्रवासी रिक्षा चालवितो. दरम्यान, तो दोन दिवसांपुर्वी दुपारी अप्पर डेपो येथून जात होता. तेव्हा दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी गुरू गौतममुनी हॉस्पीटलसमोर दुचाकी आडव्या लावून तरुणाची रिक्षा अडविली. त्याला जबरदस्तीने बाहेर काढून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. नंतर शस्त्राच्या धाकाने त्याचा मोबाईल व रोकड काढून घेतली. त्याला ऑनलाईन बॅकिंगचा पासवर्ड मागितला. पण तरुणाने तो देण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा बेदम मारहाण केली. तसेच, त्याची रिक्षा घेऊन पोबारा केला. अधिक तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.






