संग्रहित फोटो
पुणे : ज्येष्ठ नागरिकाला एक लिंक पाठवून ती उघडण्यास लावत सायबर चोरट्यांनी मोबाईल अॅक्सेस मिळवत त्यांच्या बँक खात्यातून चार लाख रुपये ऑनलाईन लंपास करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांत ७७ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, माहिती-तंत्रज्ञान कायद्याने चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सहकारनगरमधील धनकवडीत राहतात. गेल्या माहिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. खासगी कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण कक्षातून बोलत असल्याचे सांगत त्यांना वेगवेगळी कारणे सांगत आमिष दाखवले. नंतर मोबाइलवर एक फाईल पाठविली. ती फाईल उघडण्यास सांगितले. फाइल उघडल्यानंतर मात्र, मोबाईल अॅक्सेस व त्याचा पिन मिळविला. त्यानंतर तक्रारदारांच्या बँक खात्यातून ४ लाख रुपयांची रोकड चोरुन नेली. बँक खात्यातून परस्पर रोकड काढल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल मोरे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा् वाचा : शिक्रापुरात भीषण अपघात; भरधाव टँकर आडवा आल्याने कारचा चक्काचूर
मनीलॉन्ड्रींगच्या धाकाने सहा लाख उकळले
मगरपट्टा येथील एका तरुणीला आधार कार्डचा गैरवापर करून त्याद्वारे मनी लॉन्ड्रींग झाले आहे. यामुळे यात तुम्हाला अटक करावे लागेल असे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणीकडून 8 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मनीलॉन्ड्रींग झाले असून, आधार कार्डचाही गैरवापर करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते असे धमकावून केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगून तरुणीकडून 5 लाख 89 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करीत आहेत.
उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक
क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते. याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. याबद्दल ते पटवून द्यायचे. पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चशिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे.