संग्रहित फोटो
इचलकरंजी : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘जर्मन गँग’च्या नावाने दहशत माजवून शस्त्राचा धाक दाखवत हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणातील मुख्य संशयित आणि जर्मनी गँगचा म्होरक्या आनंदा शेखर जाधव ऊर्फ जर्मनी (वय २६, रा. जवाहरनगर) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
कोल्हापूर रस्त्यावर उमेश म्हेत्रे यांचे हॉटेल आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये हॉटेलमध्ये घुसून म्हेत्रे यांना व त्यांच्या मुलास मारहाण करीत चाकूचा धाक दाखवत ड्रॉव्हरमधील ७ हजारांची रोकड काढून घेत दहशत माजवली होती. ‘आम्ही आनंद्या जर्मनी गँगचे असून तू ओळखत नाहीस काय’, असे म्हणत खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ७ जणांवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी बजरंग फातले, अमर शिंगे, शुभम पट्टणकुडे, लोखंडे आणि अन्य दोघे अशा ६ जणांना यापूर्वीच अटक केली आहे.
आनंदा जर्मनी फरार होता. त्यानंतर जर्मनी टोळीवर सातव्यांदा ‘मोक्का’ लावण्यात आला होता. सातारा येथील एका गुन्ह्यात संशयित आनंदा जर्मनी याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या परवानगीने महिन्यापूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी आनंदाला ताब्यात घेऊन अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास उपअधीक्षक समीरसिंह साळवे करत आहेत. दरम्यान, जर्मनी याला तपासासाठी पाेलिसांच्या पथकाने कोल्हापूर रस्त्यावरील गुन्हा घडलेल्या ठिकाणी फिरवले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.