संग्रहित फोटो
कोल्हापूर : कसबा बावडा येथील अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. सागर भगवान रेणुसे (वय ३६, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. पेट्रोल चोरताना सापडलेल्या या चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल १७५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २ किलो ६५२ ग्रॅम चांदीचे दागिने असा २० लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ही कारवाई केली आहे.
कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात गेल्या काही महिन्यांत घरफोड्या वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस चोरट्यांच्या मागावर होते. रात्रीचे पेट्रोलिंग केले जात होते. पोलिस निरीक्षक कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस अंमलदार हिंदुराव केसरे, सोमराज पाटील, वसंत पिंगळे यांना रेणुसे हा घरफोड्या करत असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने घरफोड्या केल्याची कबुली दिली. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने सन २०२१ पासून २०२५ पर्यंत १४ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले.
पेट्राले चाेरी करताना जाळ्यात
रेणुसे हा कसबा बावड्यातील एका बँकेत सफाईचे काम करत होता. हे काम करता करता तो घरफोड्या करत होत्या. चार दिवसांपूर्वी बावड्यातील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये दुचाकीतील पेट्रोल चोरताना तरुणांनी त्याला चोप दिला. त्यानंतर रेणुसे याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याने घरफोड्यातील सोन्याचांदीचे दागिने आणि चोरलेली रोकड घरात ठेवली होती. पोलिसांनी त्याच्या घरातून मुद्देमाल जप्त केला.