Pune illegal abortion racket (Social Media)
Pune illegal abortion racket: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्येच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिस तपासात गेल्या दोन वर्षांत सुमारे 500 बेकायदा गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Pune Crime News)
दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील घसरत्या लिंग गुणोत्तरावर गंभीर चिंता व्यक्त करत या रॅकेटमधील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी 20 मे रोजी केडगाव येथून अहमदनगर जिल्ह्यातील अण्णासाहेब गिरी या बोगस डॉक्टरला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार 24 मे रोजी वाघोली येथून अतुल जाधव याला ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींना दौंड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांनी सांगितले की, मे 2026 मध्ये एका महिलेची गर्भलिंग तपासणी केल्याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंतर तांत्रिक पुरावे आणि व्हिडीओच्या आधारे तपासाची गती वाढविण्यात आली. तपासादरम्यान हे बेकायदा कृत्य रुग्णालयात नव्हे, तर एका जुन्या घरात सुरू असल्याचे उघड झाले. या घरातील एका खोलीत इंजेक्शन, औषधे, वैद्यकीय साहित्य आणि इतर उपकरणे आढळून आली. पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग तपासणी करून त्यानंतर बेकायदा गर्भपात करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यासाठी प्रत्येक महिलेकडून 35 हजार ते 50 हजार रुपये आकारले जात होते.
पोलिस चौकशीत आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांची नावे उघड केली आहेत. त्यानुसार फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 15 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यापैकी एका साक्षीदाराचा जबाब न्यायालयासमोर नोंदविण्यात आला आहे. आरोपींची बँक खाती, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि अन्य डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपातासारखे गुन्हे हे वैयक्तिक नसून संघटित टोळ्यांमार्फत चालविले जातात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये मकोकासारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांनी एका अहवालाचा हवाला देत सांगितले की, पुणे जिल्ह्यात सध्या दर एक हजार मुलांमागे केवळ 864 मुलींचा जन्म होत आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिस प्रशासनाकडून मागविण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार काही डॉक्टरांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास त्यांचे वैद्यकीय परवानेही रद्द करण्यात येतील.
– डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे.






