सुरक्षारक्षकाची रायफल हिसकावून ट्रॅक्टरच पळवला; अकोल्यात नेमकं काय घडलं?
अकोला : एकलारा शिवारात अवैध गौणखनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाच्या कामात अडथळा निर्माण करून सुरक्षा रक्षकाची रायफल हिसकावून ट्रॅक्टर पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मंडळ अधिकारी नितीन शिंदे अकोला यांनी तहसीलदारांच्या वतीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये गणेश भांडे याच्यासह अन्य दोन अनोळखीविरुद्ध कारवाई करण्यात आली. रविवारच्या मध्यरात्रीनंतर दहीहांडा मंडळ अधिकारी दत्तात्रय काळे, कापशी मंडळ अधिकारी मधुकर काळे ग्राम कासली बु पोहोचल्यानंतर आरोपीने आणखी एका व्यक्तीस बोलावून घेतल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, दोघांनी मिळून सुरक्षा रक्षकाची रायफल हिसकावून फेकून दिली.
तसेच कारवाईत अडथळा निर्माण करत ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. आगर मंडळ अधिकारी गणेश कचरे आणि सुरक्षारक्षक प्रशांत सरदार यांच्यासह एकलारा शिवारात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रणासाठी गस्त घालण्यात येत होती. दरम्यान, रात्री एक नंबर प्लेट नसलेला ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आला.
प्रकरणाचा पुढील तपास सुरू
महसूल पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तो तहसील कार्यालयात आणण्यासाठी कारवाई सुरू केली. मात्र, ट्रॅक्टरमधून अंदाजे एक ब्रास रेती किंमत सुमारे ३ हजार रुपये अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र गौणखनिज कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे व पोलिस कर्मचारी सुदीप राऊत करीत आहेत.
कोंढापुरीत डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले
दुसरीकडे, राज्यासह देशभरात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, चोरटे दररोज नागरिकांना टार्गेट करुन लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे पुणे-नगर महामार्गावर सहलीसाठी निघालेल्या डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात तिघा चोरट्यांविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
कोंढापुरीत डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले; सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे लंपास






