संग्रहित फोटो
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरात दिलेले उसने पैसे परत मागितल्याने गळा आवळून महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी (दि. २३) ही घटना उघडकीस आली आहे. शोभा सदाशिव धनवडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी शोभा धनवडे यांच्या तोंडात बोळा कोंबून अंगावरील दागिने लुटून खून करण्यात आल्याचे सुरुवातीला वाटत होते. मात्र शोभा यांनी दिलेले उसने पैसे मागितल्याने व घरासाठी काढलेले कर्ज फेडता येत नसल्याने गुरुनाथ उर्फ पिंटू भैरु चौगुले (वय ३९, रा. हट्टीबसवाणा मंदिराजवळ) याने आपल्या घरात शोभा यांचा गळा दाबून खून करुन रविवारी पहाटे सहाच्या सुमारास स्वतःच्या व्हॅनमधून तिचा मृतदेह विहिरीत ढकलून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पिंटू याने शोभा यांच्याकडून किरकोळ कामांसाठी दहा हजारांची रक्कम घेतली होती. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास तो दुचाकीवरुन त्यांच्या घराजवळून जात असताना शोभा यांनी त्याच्याकडे पैसे मागितले. पिंटू याने सततच्या तगाद्याला कंटाळून घरी चला तुम्हाला पैसे देतो, असे म्हणून त्याच्या घरी नेले. यावेळी त्याच्या घरात कुणी नव्हते. पैसे नसल्याने पिंटू हा त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी पैशासाठी पुन्हा तगादा लावल्याने रागाच्या भरात शोभा यांचा गळा आवळला. यातच त्यांचा मृत्यू झाला. पिंटू याने आवाज येऊ नये म्हणून शोभा यांच्या तोंडात बोळा कोंबून जोरात गळा आवळला. अंगावरील सर्व दागिने काढून घेतले व मृतदेह ओमनी गाडीत ठेवला व पहाटे विहिरीत फेकून दिला.
तगादा व विवंचनेतून उचलले पाऊल
गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे गोपनीय कर्मचारी सतीश पाटील यांना शोभा यांना गाडीवरुन नेणारी व्यक्ती पिंटूच असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठांना कल्पना दिली. पोलिस अधीक्षकांनी रविवारी सातहून अधिक कर्मचाऱ्यांची पथके यासाठी तैनात केली. अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाने तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला रात्री अकराच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याने पैशाचा तगादा व कर्जाच्या विवंचनेतून खून केल्याची कबुली दिली.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.