बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड; गच्चीवर झोपलेल्या आईसह दोन मुलांची तलवारीने निर्घृण हत्या
पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ भेट देत परिसराला बॅरिकेडिंग करून बंदोबस्त वाढविला आहे. बोरामणी येथील मस्के कुटुंबाची सलग तीन घरे असून मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची बारावीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी प्रिया मस्के (वय १८) आणि दहावीत शिकणारा मुलगा शिवराय मस्के (वय १६) हे तिघेजण राहत होते. गुरुवारी रात्री उष्म्यामुळे तिघेही घराच्या गच्चीवर झोपले होते. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने घराच्या गच्चीवर प्रवेश करून अचानक तलवारीने सपासप वार केल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया यांचा गच्चीवरच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला शिवराय जीव वाचविण्यासाठी खाली बैठकीच्या खोलीत धावत आला असावा, मात्र तेथेच त्याचाही रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ज्ञ तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.
जमिनीच्या वादातून हत्याकांडाची शक्यता
पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ते सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. गायत्री मस्के या विधवा असून त्या आपल्या दोन मुलांसह स्वतःच्या घरात राहत होत्या. शेजारी त्यांचे सख्खे दीर राहत असल्याची माहिती समोर आली आहे. घर, शेतजमीन आणि कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. १) दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घालत जाधववाडी धरणात सेल्फी घेण्याच्या नादात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. याच दिवशी पवना नदी येथेही एका तरुणाचा जीव गेल्याने मावळमध्ये एकाच दिवसात चार जणांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरणावर ही दुर्घटना घडली आहे. धरणात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याची खोली न समजल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके अशी मृत तरुणांची नावे असून ते तिघेही पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरातील रहिवासी होते. भोसरी एमआयडीसीतील खासगी कंपनीत काम करणारे हे तरुण मूळचे परभणी जिल्ह्यातील होते. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत मावळमध्ये फिरण्यासाठी आले असताना ही दुर्घटना घडली आहे.






