चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला विहिरीत उलटे करून मारले Photo credit - Social Media
जगभरात विविध देश एआय क्षेत्रात प्रगती करत असून भारतात मात्र अजूनही जातीयवादावरून एकमेकांचे लचके तोडण्याचे काम राजरोसपणे चालू आहे. हरियाणातील हिसारमधून पुन्हा नव्याने एक धक्कादायक घटना समोर आली असून चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. चोरीच्या संशयावरून त्या तरुणाला निर्घृणपणे मारहाण करून चक्क विहिरीत उलटे लटकवण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून संतापाचे वातावरण झाले आहे.
हरियाणातील हिसार जिल्ह्यातील हांसी भागातील सोरकी या गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. याबाबतचा एक व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून याबाबत आता पोलिसांनीदेखील ऍक्शन घेतली आहे. व्हिडियोत दिसत असल्याप्रमाने काही लोक एका दलित युवकाला पाण्याची मोटार चोरी करत असल्याच्या संशयावरून जबरदस्त मारहाण करत आहेत. मात्र, त्यानंतर लोकांच्या जमावाने त्या युवकाला चक्क विहिरीत उलटा टांगून लटकावला. यादरम्यान तो युवक रडत, ओरड असल्याचे तसेच गयावया करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडियो वायरल झाल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे समजत आहे. या घटनेवरून परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. हि घटना १ जून रोजी घडल्याचे समाजात असून आता याची व्हिडियो मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
याबाबत आता वंचित बहुजन आघाडीने देखील भूमिका घेतली असून आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. वंचितच्या अधिकृत X अकाऊंटवरून याची माहिती देण्यात आली. या पोस्ट मध्ये स्पष्ट करण्यात आले कि, “हरियाणातील हिसार जिल्ह्यातील हांसी भागातील सोरकी गावात एका दलित तरुणासोबत झालेली अमानुषता अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद आहे. चोरीच्या संशयावरून त्या तरुणाला निर्घृणपणे मारहाण करून विहिरीत उलटे लटकवल्याच्या घटनेमुळे कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा दलित, वंचित आणि असुरक्षित गटांच्या सुरक्षेची खात्री करण्याबाबत सरकार किती गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. जर गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाली नाही, तर अशा घटनांची तीव्रता वाढते.”
“भाजपशासित राज्यांमध्ये घडणाऱ्या अशा क्रूर घटनांसाठी सरकारने उत्तर दिलेच पाहिजे. देशभरात दलित, आदिवासी आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आमची हरियाणा सरकारकडे मागणी आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोरतम शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात दलित आणि आदिवासींशी अमानुषपणे व क्रूरतेने वागण्याचे धाडस कोणालाही होणार नाही,” असाही विनंती पोस्टमधून करण्यात आली.
Crime News: अनोळखी मृतदेहापासून खुनाचा उलगडा; नवघर पोलिसांनी २ तासांत आरोपींना जेरबंद केले






