(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Actor in Old Age Home: चित्रपटसृष्टीतील झगमगाटामागचं वास्तव अनेकदा अत्यंत वेदनादायी असतं. पडद्यावर वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अनेक कलाकारांना आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अशीच हृदयद्रावक कहाणी आहे ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहन शर्मा यांची. एकेकाळी चेन्नईतील पॉश पोएस गार्डन परिसरात स्वतःचं घर असलेले मोहन शर्मा आज वयाच्या ८०व्या वर्षी वृद्धाश्रमात राहण्यास मजबूर आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे औषधांचा खर्च भागवण्यासाठीही पुरेसे पैसे नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मोहन शर्मा यांनी अभिनयासोबत दिग्दर्शन, निर्मिती आणि पटकथालेखन या क्षेत्रातही उल्लेखनीय काम केलं. ते South Indian Film Chamber of Commerce चे अध्यक्षही राहिले आहेत. चित्रपटांमधील काम कमी झाल्यानंतर त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांकडे वळत कोलांगल, मुंथनाई मुडिचू, वाणी राणी, माया आणि थलाट्टू यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या.
२०१२ मध्ये त्यांनी ‘नम्मा ग्रामम’ या तमिळ चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली. या चित्रपटाला तमिळनाडू आणि केरळ सरकारकडून पुरस्कारही मिळाले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं असून, तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या परीक्षक मंडळावरही त्यांनी काम केलं आहे.
केरळमधील पालक्काड येथे जन्मलेल्या मोहन शर्मा यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून पदवी मिळवली. या संस्थेतून पदवी घेणारे ते पहिले दक्षिण भारतीय ठरले. त्यानंतर त्यांनी शिवाजी गणेशन, विजयकांत, सरथकुमार, अजित कुमार, थलपती विजय यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं.
वैयक्तिक आयुष्यातही अनेक संकटं
मोहन शर्मा यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटातील सहकलाकार अभिनेत्री लक्ष्मी यांच्याशी विवाह केला होता. मात्र, पाच वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी शांती यांच्याशी विवाह केला. यशस्वी कारकीर्द असूनही वैयक्तिक आयुष्यात अनेक आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागल्याचं त्यांनी सांगितलं.
पोएस गार्डनमधील घर विकल्यानंतरही त्यांची परिस्थिती सुधारली नाही. अखेर मित्रांच्या मदतीने त्यांना गुम्मिडीपुंडी येथील एका जैन वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांना राहण्यासाठी निवारा आणि अन्न मिळत असलं तरी वृद्धापकाळाशी संबंधित आजारांवरील औषधांचा खर्च परवडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मोहन शर्मा यांच्या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीमुळे काही काळासाठी त्यांचा खर्च भागवता आला. मात्र, त्यांनी चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांकडे पुन्हा मदतीचं आवाहन केलं आहे.
तसंच, त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेता थलपती विजय यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘सचिन’ चित्रपटात विजयसोबत काम केलेल्या मोहन शर्मा यांनी पुन्हा एकदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची ही कहाणी सध्या अनेकांना भावूक करत आहे.






