(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय अध्यात्मिक मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये एक नवीन आणि प्रेरणादायी पर्व सुरू झाले आहे. ‘प्रारब्धाचा शिल्पकार ब्रह्मांडनायक’ या नव्या अध्यायाच्या माध्यमातून स्वामी समर्थांच्या दिव्य लीलांचा आणि भक्तांवरील कृपेचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.भक्तांचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे स्वामी समर्थ संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावून येतात, अशी श्रद्धा लाखो भक्तांमध्ये आहे. जीवनातील अडचणी, दुःख आणि संकटांच्या काळात स्वामींचे सगुण रूप भक्तांना आधार आणि नवसंजीवनी देते. स्वामींच्या कृपेने प्रत्येक जीवाच्या प्रारब्धाची दिशा बदलू शकते, हा संदेश या नव्या अध्यायातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.गुरुदेवांवरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि दिव्य अनुभूती यांवर आधारित हा नवा भाग प्रेक्षकांना भावनिक तसेच आध्यात्मिक अनुभव देणारा ठरणार आहे. ‘ब्रह्मांडनायक’ या अध्यायात स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलांचे आणि भक्तांच्या जीवनातील परिवर्तनाचे विविध प्रसंग पाहायला मिळणार आहेत.स्वामी भक्तांसाठी आनंदाची बाब म्हणजे या नव्या पर्वाची सुरुवात याच आठवड्यापासून झाली असून, ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका आता दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित केली जाणार आहे.
नव्या अध्यायात आता एक भावनिक, कौटुंबिक आणि उत्कंठावर्धक कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या कथानकात अक्कलकोटमध्ये राहणारी स्वामीभक्त गौरी एका असाध्य आजाराशी झुंज देताना दिसणार आहे. वैद्यांच्या मते तिच्याकडे फक्त येत्या पौर्णिमेपर्यंतचाच काळ उरला आहे. अशा परिस्थितीत आपल्या मुली यमुनेचे लग्न डोळ्यांनी पाहावे आणि स्वामींच्या आशीर्वादाने मिळालेले घर तिच्या सुरक्षित भविष्यासाठी तिच्याकडे सोपवावे, हीच गौरीची शेवटची इच्छा आहे.गौरी स्वामी समर्थांसमोर एकच मागणी करते – “मला मरण्याआधी माझ्या मुलीचं लग्न पाहायचंय.” तिची निस्सीम भक्ती, श्रद्धा आणि स्वामींवरील अढळ विश्वास पाहून स्वामी तिला आश्वासन देतात, “तुला तुझ्या मुलीचं लग्न पाहायला नक्कीच मिळणार, आम्ही शब्द देतो.”
मात्र, गौरीच्या अडचणींचा फायदा घेण्यासाठी काही दुष्ट प्रवृत्ती तिच्या घरावर डोळा ठेवून आहेत. गावातील एक क्रूर सरदार मोक्याच्या जागेवर असलेले गौरीचे घर बळकावण्याच्या प्रयत्नात आहे. घर मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. दुसरीकडे, यमुनेचे नाते एका प्रामाणिक तरुणाशी जुळत असताना तिच्याविरुद्ध कट-कारस्थानांचे जाळे विणले जात आहे.
मृत्यूची सावली डोक्यावर असल्याने गौरी घाईघाईत स्वामींच्या काही गूढ संकेतांकडे दुर्लक्ष करते. अशा वेळी स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी कोणती लीला घडवतात, संकटांमधून त्यांना कसे बाहेर काढतात आणि दुष्ट शक्तींना कसा धडा शिकवतात, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
“गुरुने दिलेला शब्द गुरु पाळतो म्हणजे पाळतोच!” या संदेशाला अधोरेखित करणारा हा अध्याय भक्ती, विश्वास, संघर्ष आणि स्वामींच्या चमत्कारांनी परिपूर्ण असणार आहे. गौरीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना आणि दुष्ट प्रवृत्तींचे डाव अधिक तीव्र होत असताना कथा कोणते वळण घेणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.






