(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. NEET पेपरफुटी प्रकरण, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या चर्चां आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे Gen Z आणि विशेषतः तरुण हिंदू महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कंगनाने “तरुण हिंदू महिलांवर” हल्ला चढवत त्यांना “कुरूप आणि भ्रष्ट” म्हटले आहे. इतकेच नाही, तर तिने या तरुण पिढीला “गटार” म्हटले असून, त्यांच्यावर “ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनेक लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्याचा” आरोप केला आहे.
इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने आजच्या तरुण पिढीवर टीका करत स्वतंत्र आयुष्य, जबाबदारी आणि पाश्चात्त्य प्रभाव यावर भाष्य केले. तिने काही तरुण महिलांविषयी अत्यंत कठोर आणि वादग्रस्त शब्दांचा वापर केला. तसेच, काही जणी स्वातंत्र्याच्या नावाखाली चुकीच्या सवयींचे समर्थन करतात, असा आरोपही तिने आपल्या पोस्टमध्ये केला.
कंगना रणौत इथेच थांबत नाही. ती पुढे लिहिते, ”पाश्चात्त्यीकरण झालेल्या भारतीय महिलांची एक नवीन पिढी आहे. मी त्यांना ‘गटर पिढी’ म्हणते. त्यांच्यापैकी काहींकडे व्यवस्थेला देण्यासारखं काहीच नाही. त्या अभ्यासात हुशार नाहीत, पण त्या इतक्या कुरूप आणि भ्रष्ट आहेत की त्या एक चांगली गृहिणीसुद्धा होऊ शकत नाहीत. तरीही त्या ड्रग्स घेण्याचं, दारू पिण्याचं किंवा अनेक पुरुषांशी संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य अभिमानाने मिरवतात. त्या निर्लज्जपणे आपल्या आई-वडिलांच्या कमाईवर जगतात, आणि प्रत्यक्षात स्वतंत्र नसतानाही स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी सतत संघर्ष करत असतात.”
मंडीच्या खासदार कंगना रणौत (४०) यांनी आपल्या पोस्टचा समारोप करताना लिहिले की, “स्वतंत्र आयुष्य कमवावे लागते” आणि “जर तुम्ही जबाबदारीशिवाय स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही फक्त एक बिघडलेली व्यक्ती आहात. गटर छाप.”
कंगना रणौतच्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे.AIMIM नेते वारिस पठाण यांनी कंगनाने आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्याची दखल घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.






