(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी अभिनेता अमेय वाघ लवकरच ‘फ्रेम’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून, भूमिका स्वीकारण्यामागचे कारण आणि चित्रपटाचा मुख्य संघर्ष याबाबत त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला आहे.
अमेय वाघ म्हणाला, “माझ्या मते या चित्रपटातील संघर्षच सर्वात रंजक आहे, कारण एक कलाकार म्हणून मी त्या संघर्षाशी स्वतःला जोडू शकतो. आजच्या काळात हा संघर्ष केवळ कलाकार, फोटो जर्नालिस्ट किंवा माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येकजण एका क्लिकमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढू शकतो.”
तो पुढे म्हणाला, “एखाद्याचा फोटो किंवा व्हिडिओ काढण्यापूर्वी त्याची संमती घेणे किती महत्त्वाचे आहे, हा आजच्या काळातील मोठा विषय आहे. अनेकांना अजूनही हे समजत नाही की, दुसऱ्या व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक असते. मी कलाकार असल्यामुळे माझ्या आसपासच्या लोकांबद्दल सहानुभूती बाळगू शकतो. पण जर मी माध्यम प्रतिनिधीची भूमिका साकारत असेन, तर माझ्यासाठी सहानुभूती महत्त्वाची की माझे काम? हाच या चित्रपटाचा खरा संघर्ष आहे.”
नागराज मंजुळेसोबतच्या प्रसंगाची खास आठवण
चित्रपटात नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही अमेयने शेअर केला.
तो म्हणाला, “चित्रपटात एक असा प्रसंग आहे, ज्यामध्ये आम्ही दोघे एकाच घटनेचे फोटो काढत असतो. त्या दृश्यात एकही संवाद नाही. पण दिग्दर्शक विक्रम यांनी ते इतक्या सुंदर पद्धतीने साकारले की, आम्ही एकमेकांकडे पाहण्याच्या पद्धतीतूनच अनेक भावना व्यक्त होत होत्या. तो प्रसंग माझ्यासाठी खूप खास आहे.”
याशिवाय आणखी एका प्रसंगाची आठवण सांगताना अमेय म्हणाला, “एका दृश्यात नागराज यांच्या व्यक्तिरेखेचा संयम सुटतो आणि ते व्यवस्था, तत्त्वे आणि नैतिक मूल्यांबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त होतात. त्याच वेळी ते मला बाहेरच्या जगापासून वाचवण्याचाही प्रयत्न करत असतात. हे दृश्य पहाटे चित्रीत करण्यात आले होते. दिग्दर्शक विक्रम यांनी मला फक्त सेटवर येऊन नैसर्गिक प्रतिक्रिया द्यायला सांगितले होते. त्यामुळे संपूर्ण प्रसंग अत्यंत वास्तववादी झाला. त्या दृश्यातील नागराज यांचा अभिनय माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय आहे.”
‘फ्रेम’मधून अमेय वाघ एका वेगळ्या आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या भूमिकेत दिसणार असून, चित्रपटातील सामाजिक आशय आणि वास्तववादी मांडणीबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.






