( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Mamachya Govyala Jauya: आगामी मराठी चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ (Mamachya Govyala Jauya)आपल्या भन्नाट गाण्यांमुळे आधीच चर्चेत आहे. आता चित्रपटातील आणखी एक प्रमोशनल गाणं ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, साऊथ इंडियन स्टाईल, जोशपूर्ण संगीत आणि दमदार सादरीकरणामुळे या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
‘वणक्कम’ या गाण्यात साऊथ इंडियन संगीताची लय, रंगतदार बीट्स आणि उत्साहाने भरलेला माहोल अनुभवायला मिळतो. आकर्षक कोरिओग्राफी आणि धमाल सादरीकरणामुळे हे गाणं प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडतं. गोव्याच्या पार्श्वभूमीवर साऊथ इंडियन तडका देणारं हे गाणं चित्रपटाच्या मजेशीर आणि मनोरंजक प्रवासाची आणखी एक झलक दाखवतं.
मराठी चित्रपटात साऊथ इंडियन शैलीचा असा हटके प्रयोग प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. या गाण्याला अवधूत गुप्ते आणि राहुल देशपांडे यांच्या दमदार आवाजाची साथ लाभली आहे. गाण्याचे बोल आणि संगीतही अवधूत गुप्ते यांचेच असून, त्यांच्या संगीतामुळे गाण्याला वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली आहे.
या गाण्याविषयी दिग्दर्शक विजू माने म्हणाले, “‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट जसा मनोरंजनाचा धमाल प्रवास आहे, तसंच त्यातील प्रत्येक गाणंही वेगळा अनुभव देणारं आहे. ‘वणक्कम’ करताना आम्ही साऊथ इंडियन संगीताचा उत्साह, ऊर्जा आणि सेलिब्रेशनची भावना मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे गाणं अत्यंत एंटरटेनिंग आहे आणि चित्रपटात वेगळीच रंगत आणतं. विशेष म्हणजे, हे गाणं आम्ही सुपरस्टार रजनीकांत यांना समर्पित करत आहोत. प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल, असा मला विश्वास आहे.”
‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत.
मैत्री, धमाल आणि मनोरंजनाचा अनोखा अनुभव देणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट ३१ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.






