( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ सध्या अत्यंत रंजक वळणावर पोहोचली आहे. छवीचा राजगुरू कुटुंबात अधिकृत गृहप्रवेश झाल्यानंतर बाईआजींनी तिला घराची सून म्हणून मनापासून स्वीकारले आहे. मात्र, छवी आणि अनिकेत यांच्यातील नात्यात अजूनही अवघडलेपण कायम असून, बाईआजी या दोघांमधील दुरावा कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
दुसरीकडे, राजगुरू कुटुंबाचा सर्वनाश करण्याच्या इर्षेने पेटलेली शांभवी आणि बेबी आत्या छवीविरोधात नवनवीन कारस्थानं रचत आहेत. मात्र, यावेळी छवीही गप्प बसणार नाही. ती शांभवीला स्पष्ट इशारा देत म्हणते, “पुढच्या वेळेस नेम माझा असेल.” त्यामुळे येत्या भागांमध्ये या दोन महिलांमधील संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वटसावित्री पूजेच्या निमित्ताने घरात आनंदाचे वातावरण असताना, शांभवी मात्र छवीचे लग्न मोडण्याचा डाव आखत आहे. त्याचवेळी तिला ‘राजनाथ’ नावाच्या व्यक्तीकडून ५० लाख रुपयांची धमकी देणारे फोन येऊ लागतात. या धक्क्यातच घरात राजनाथची एक गुप्त फाईल येते. शांभवी ती लपवण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या छवीच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नाही. त्यामुळे शांभवीबद्दलचा छवीचा संशय अधिकच गडद होतो.
दरम्यान, अनिकेत आणि छवी यांच्यात पहिल्यांदाच मनमोकळा संवाद होतो. अनिकेत तिच्यासोबत मैत्रीचं नातं जपण्याचा निर्णय घेतो. मात्र, दोघांमधील वाढत असलेली जवळीक शांभवीला सहन होत नाही. ती जाणीवपूर्वक ‘जेसिका’च्या नावाचा वापर करून छवीच्या मनात अनिकेतबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडते. बाईआजींच्या औषधांमध्ये पुन्हा एकदा जीवघेणा फेरफार करण्यात येतो. त्यामुळे आता छवी शांभवीचा खरा चेहरा संपूर्ण राजगुरू कुटुंबासमोर कसा आणणार आणि कुटुंबाला या संकटातून कसं वाचवणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
छवी आणि शांभवी यांच्यातील हा संघर्ष कोणत्या टोकाला पोहोचणार, हे जाणून घेण्यासाठी ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका १२ जुलैपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता फक्त ‘कलर्स मराठी’वर पाहता येणार आहे.






