( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर कठोर शब्दांत टीका करत आपली भूमिका मांडली.
‘द प्रिंट’ला दिलेल्या मुलाखतीत करण थापर यांच्याशी संवाद साधताना नसीरुद्दीन शाह म्हणाले, “मी नरेंद्र मोदींना गांभीर्याने घेत नाही.” तसेच त्यांनी असा आरोप केला की, “जे स्वतः निरक्षर आहेत, त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळत नाही.” मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मोदींना “खोटारडे” असे संबोधले, तर सरकारवरही कठोर शब्दांत टीका केली.
या ७६ वर्षीय अभिनेत्याने दिल्लीच्या जंतर-मंतरपासून मुंबई, बिहार, पंजाब, मिझोराम आणि तिरुवनंतपुरमपर्यंत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांना पाठिंबा व्यक्त केला. २० जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केलेल्या कारवाईचाही त्यांनी निषेध केला. यावेळी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांवर रॅपिड ॲक्शन फोर्सचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुलाखतीत पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी असा आरोप केला की, पंतप्रधानांनी कधीही आपल्या चुकांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तसेच विविध सार्वजनिक विधानांचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर आणि पंतप्रधानांवर टीका केली.
पुढे बोलताना नसीरुद्दीन शाह यांनी असा दावाही केला की, “स्वतः कधी परीक्षा दिली नसलेली व्यक्ती विद्यार्थ्यांना परीक्षांबाबत सल्ला देते,” तसेच शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेबाबत सरकारच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही त्यांनी आरोप केले.






