(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ramayana Controversy: दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित आणि भव्य पौराणिक चित्रपट ‘रामायण’ प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि यश यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. (Ramayana Controversy)
‘रामायण’चा ट्रेलर ३० जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवी आणि चित्रपटातील काही दृश्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता हे प्रकरण वाढलं असून श्री रामलीला महासंघ, दिल्ली यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना थेट इशारा दिला आहे.
महासंघाचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्मिती टीमला पत्र पाठवत मागणी केली आहे की, चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होण्यापूर्वी महासंघाच्या विशेष प्रतिनिधी मंडळासाठी त्याचे खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात यावे.
महासंघाने आपल्या पत्रात प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे उदाहरण दिलं आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भांमध्ये बदल केल्यामुळे यापूर्वी काही चित्रपटांना विरोधाचा सामना करावा लागला होता, असं महासंघाचं म्हणणं आहे.
‘रामायण’मध्येही काही दृश्यांमुळे सनातन संस्कृती आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, अशी भीती महासंघाने व्यक्त केली आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्याआधी विशेष स्क्रीनिंगची मागणी पूर्ण न झाल्यास शांत बसणार नसल्याचं महासंघाने स्पष्ट केलं आहे. जर चित्रपटात आक्षेपार्ह बाबी आढळल्या, तर दिल्लीसह देशभरातील हिंदू संघटनांसोबत चित्रपटगृहांबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, ‘रामायण’ दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून, पहिला भाग यावर्षी दिवाळीत तर दुसरा भाग पुढील वर्षी दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनापूर्वी निर्माण झालेल्या या वादामुळे निर्मात्यांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे.






