एअर इंडियाची २३ मजली इमारत आता महाराष्ट्र सरकारची! (Photo Credit- X)
या करारावर स्वाक्षरी होताच, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या या अवाढव्य आणि ऐतिहासिक इमारतीची मालकी अधिकृतपणे महाराष्ट्र सरकारकडे आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, केंद्र सरकारने मार्च २०२४ मध्ये या इमारतीची विक्री महाराष्ट्र सरकारला करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर सर्व आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा व्यवहार आता पूर्णत्वास गेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या हस्तांतरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या ऐतिहासिक प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैस्कर आणि एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कराराच्या नोंदणीमुळे मुंबईच्या सागरी किनाऱ्यावरील एका मोठ्या वास्तूचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. मात्र, सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात या कराराच्या अंतिम वित्तीय अटींचा व रक्कमेचा सविस्तर खुलासा करण्यात आलेला नाही.
अरबी समुद्राला तोंड करून उभी असलेली २३ मजली ‘एअर इंडिया’ची ही इमारत मुंबईच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आणि शहराची मोठी ओळख मानली जाते. अनेक दशकांपासून ही वास्तू एअर इंडियाच्या वैभवाचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक राहिली आहे. १९७४ मध्ये बांधण्यात आलेल्या या इमारतीची रचना जगातील प्रसिद्ध वास्तूविशारद जॉन बर्गी यांनी केली होती.
दीर्घकाळ एअर इंडियाचे मुख्य मुख्यालय म्हणून या इमारतीचा वापर केला जात होता. मात्र, वर्ष २०१३ मध्ये एअर इंडियाने आपले मुख्य कार्यालय मुंबईहून दिल्लीला स्थलांतरित केले, तेव्हापासून ही इमारत अंशतः रिकामी होती. आता महाराष्ट्र सरकारने ही जागा अधिग्रहित केल्यामुळे, मंत्रालयातील विविध सरकारी विभागांच्या विस्तारासाठी आणि अतिरिक्त कार्यालयांसाठी या अद्ययावत जागेचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल.
Mumbai News: मुंबईच्या 7 तलावांत केवळ 45 दिवसांचा पाणीसाठा; IMD च्या अंदाजाने BMC ची चिंता वाढली






