संसदेत राहुल गांधींच्या 'इडियट' आणि 'अंधभक्त' वक्तव्यावरून गदारोळ; वादग्रस्त शब्द लागले हटवावे
Rahul Gandhi News Marathi: लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयकावरील चर्चेदरम्यान आज (29 जुलै 2026) विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भाषणावरून मोठा गदारोळ झाला. भाषणात एका विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा संदर्भ देताना राहुल गांधी यांनी ‘स्टुडंट’, ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ या शब्दांचा उल्लेख केला. या शब्दांवर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संबंधित टिप्पणी लोकसभेच्या अधिकृत कामकाजाच्या नोंदीतून वगळण्यात आली.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला काही तरुण विद्यार्थिनींशी झालेल्या संवादाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी सांगितले की, एका विद्यार्थिनीने ‘स्टुडंट’ म्हणजे खुल्या मनाने शिकणारी, इतरांचे विचार ऐकणारी आणि सत्य स्वीकारण्याची तयारी असलेली व्यक्ती अशी व्याख्या केली. तसेच त्या विद्यार्थिनीने त्यांना आणखी एका प्रकारच्या लोकांबद्दल सांगितले. हे लोक स्वतःला सर्वज्ञ समजतात, इतरांचे मत ऐकत नाहीत आणि स्वतःलाच सर्वकाही माहिती असल्याचा गर्व बाळगतात. राहुल गांधी यांनी विद्यार्थिनीला विचारले की, अशा लोकांना ती काय म्हणते. त्यावर विद्यार्थिनीने “मी त्यांना इडियट म्हणते,” असे उत्तर दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी असंसदीय शब्दांचा वापर केल्याचा आक्षेप घेत राहुल गांधींनी तो शब्द मागे घ्यावा, अशी मागणी केली.
यावर राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, “मी सभागृहातील कोणत्याही सदस्याला ‘इडियट’ म्हणत नाही. मी एका विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा संदर्भ देत आहे,” असे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी पुन्हा विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा उल्लेख करत तिने ‘अंधभक्त’ या संज्ञेचाही वापर केल्याचे सांगितले. त्यांच्या मते, त्या विद्यार्थिनीने तीन प्रकार सांगितले होते – ‘स्टुडंट’, ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’. या उल्लेखानंतरही सत्ताधारी सदस्यांनी पुन्हा आक्षेप घेत गदारोळ केला.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना विधेयकावरील चर्चेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्याचवेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत राहुल गांधींना बोलू देण्याची विनंती केली, मात्र ‘इडियट’ हा शब्द सभागृहाच्या अधिकृत नोंदीतून वगळण्याची मागणी केली. अध्यक्षांनी ही मागणी मान्य करत संबंधित शब्द लोकसभेच्या कामकाजातून हटविण्याचे निर्देश दिले. या घटनेनंतर संसदेत काही काळ गदारोळ सुरू राहिला. राहुल गांधी यांनी मात्र आपण कोणत्याही खासदाराला उद्देशून हे शब्द वापरले नसून विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा संदर्भ मांडत असल्याचा पुनरुच्चार केला.






