National News: देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; भाजप खासदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट
भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेसचे सुमारे ५० आमदार सध्या पक्षावर नाराज आहेत. पक्षाच्या २० खासदारांमध्येही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. भाजप खासदाराचे ठाम म्हणणे आहे की, जर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने संमती दिली, तर हे नेते पक्ष बदलून भाजपमध्ये सामील होण्यास सज्ज आहेत. या संदर्भात भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जर ही परिस्थिती प्रत्यक्षात आली तर तृणमूल काँग्रेसचे अस्तित्वच संपुष्टात येईल, असा दावा आय भाजप खासदाराने केला.
विशेष म्हणजे, सौमित्र खान यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा १०० हून अधिक नगरसेवकांनी यापूर्वीच तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, काकोली घोष दस्तीदार आणि फिरहाद हकीम यांसारखे पक्षातील प्रमुख नेते नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. आमदार हकीम यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली नसली, तरी दस्तीदार यांनी मात्र आपली नाराजी यापूर्वीच बोलून दाखवली आहे. त्यांच्या मुलाने तर, दस्तीदार आपल्या खासदारकीच्या जागेचाही राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले होते.
तृणमूलचे ज्येष्ठ खासदार सौगत रॉय यांनी ते पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले. रॉय म्हणाले, भाजप आणि सौमित्र खान पत्रकारांना जे काही सांगत आहेत ते उघड खोटे आहे. असे काहीही होणार नाही. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलचे अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये सामील झाले होते, परंतु ममता बॅनर्जी यांचा पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ते परतले. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. बंगालमध्ये आता भाजप सत्तेवर असून, तृणमूलच्या पंधरा वर्षांच्या राजवटीचा अंत झाला आहे. तृणमूलमध्ये ‘सर्व काही ठीक नाही’ याची चिन्हे स्पष्ट होत असतानाच या अटकळी निर्माण होत आहेत. गेल्या काही आठवड्यांत, अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.






