'फॉरेस्टर' पतंगाची नवी प्रजाती (फोटो- सोशल मीडिया)
शास्त्रज्ञांनी शोधून काढली ‘फॉरेस्टर’ पतंगाची नवी प्रजाती
नवीन प्रजातीला विशेष वैज्ञानिक महत्त्व
भारतासह इंडो-ऑस्ट्रेलियन प्रदेशात प्रजातीचा वावर
सुनयना सोनवणे /पुणे: पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या अभ्यासात महत्त्वाची भर घालत भारतीय प्राणी सर्वेक्षण विभाग पुणे येथील पश्चिम प्रादेशिक केंद्रातील शास्त्रज्ञांनी ‘फॉरेस्टर’ पतंगाची नवी प्रजाती (Navarashtra Special) शोधून काढली आहे. कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प परिसरात आढळलेल्या या प्रजातीला ‘मिम्युसेमिया काली’ असे नाव देण्यात आले आहे. जवळपास तीन दशकांनंतर मिम्युसेमिया वंशात समाविष्ट झालेली ही पहिली नवीन प्रजाती ठरल्याने या शोधाला विशेष वैज्ञानिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
हा अभ्यास भारतीय प्राणी सर्वेक्षण, पुणे येथील वैज्ञानिक-ई डॉ. अपर्णा सुरेशचंद्र कलावटे यांच्या नेतृत्वाखाली आणि लंडनमधील नैसर्गिक इतिहास संग्रहालयाचे वरिष्ठ क्युरेटर व पतंग अभ्यासक डॉ. ग्युला एम. लास्झलो यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला. या संशोधनाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘झूटॅक्सा’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.
मिम्युसेमिया हा रंगीत आणि तुलनेने कमी अभ्यासलेला फॉरेस्टर पतंगांचा समूह असून त्याचा प्रसार भारतासह इंडो-ऑस्ट्रेलियन प्रदेशात आहे. हे पतंग मुख्यतः दिवसा सक्रिय असतात; मात्र काही प्रजाती संध्याकाळी किंवा रात्रीही सक्रिय होऊन प्रकाशाकडे आकर्षित होतात. नव्याने सापडलेली मिम्युसेमिया काली ही प्रजाती दिसायला काही विद्यमान प्रजातींसारखी असली तरी शरीररचना, जनुकीय विश्लेषण आणि वर्गीकरणीय तपासणीतून ती स्वतंत्र प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संशोधनात मिम्युसेमिया वंशाचा अद्ययावत जागतिक आढावाही सादर करण्यात आला असून जगभरातील ३० प्रजाती-गटांची नोंद करण्यात आली आहे. भारतात या वंशाच्या सहा प्रजातींची नोंद असून नव्या शोधामुळे पश्चिम घाटाचे जागतिक जैवविविधतेतील स्थान पुन्हा अधोरेखित झाले आहे.
काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral
हा शोध का महत्त्वाचा?
– मिम्युसेमिया वंशात जवळपास ३० वर्षांनंतर नव्या प्रजातीची भर
– पश्चिम घाटातील अजूनही नोंद न झालेल्या जैवविविधतेचा ठोस पुरावा
– कीटक विविधतेच्या संवर्धनासाठी आवश्यक मूलभूत माहिती उपलब्ध
– भविष्यातील पर्यावरणीय, उत्क्रांती आणि संवर्धन संशोधनासाठी महत्त्वाचा आधार
पतंगांचे पर्यावरणीय महत्त्व –
– पतंग हे परिसंस्थेच्या आरोग्याचे महत्त्वाचे निर्देशक मानले जातात.
– अनेक वनस्पतींच्या परागीभवनात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो.
– त्यांच्या अळ्या पोषणचक्र आणि ऊर्जा प्रवाहात योगदान देतात.
– पक्षी, वटवाघुळे, सरपटणारे प्राणी आणि इतर अनेक जीवांसाठी ते महत्त्वाचे अन्नस्रोत असतात.
– पतंगांच्या संख्येतील बदलांमधून अधिवासातील बदल, प्रदूषण आणि हवामान बदलांचे संकेत मिळतात.
‘हा पतंग शोधण्याचा क्षण माझ्यासाठी अत्यंत विशेष होता. पतंगांच्या अभ्यासातील माझ्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत मिम्युसेमिया वंशातील सदस्य मला प्रथमच प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यासादरम्यान आढळला. त्याचे आकर्षक स्वरूप पाहताच तो काहीतरी वेगळा असल्याची जाणीव झाली. क्षेत्रीय निरीक्षणातून सुरू झालेली उत्सुकता पुढे सविस्तर वर्गीकरणीय आणि जनुकीय अभ्यासापर्यंत पोहोचली आणि अखेरीस ही विज्ञानासाठी नवी प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले. अशा शोधांमुळे पश्चिम घाटात अजूनही अनेक रहस्ये दडलेली असल्याची आणि भारतातील समृद्ध कीटक जैवविविधतेबाबत अजून खूप काही जाणून घेण्याची गरज असल्याची जाणीव होते.’
– डॉ. अपर्णा एस. कलावटे,
वैज्ञानिक-ई, भारतीय प्राणी सर्वेक्षण विभाग, पुणे






