चेहऱ्यावर साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचा टॅन दिसते? मग 'या' साली पाण्यात मिक्स करून घ्या वाफ, त्वचेची छिद्र होतील स्वच्छ
कामानिमित्त बाहेर जाताना धूळ, माती आणि प्रदूषणाच्या सानिध्यात आल्यामुळे त्वचा चिकट होऊन जाते. त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा झाल्यामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि मुरूम येतात. चेहऱ्यावर आलेले ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप किंवा फेशिअल केले जाते. यामुळे त्वचेच्या छिद्रांमधील घाण वरच्या वर स्वच्छ केली जाते. पण काही दिवसांनंतर पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाते. चेहऱ्यावर आलेले ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स घालवण्यासाठी कोणत्याही क्रीमचा वापर करण्याऐवजी नियमित किंवा आठवड्यातून तीनदा वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)
काहींची त्वचा खूप जास्त कोरडी असते, तर काहींची खूप जास्त तेलकट असते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. गरम पाण्याची वाफ घेताना नुसतीच पाण्याची वाफ न घेता वेगवेगळ्या फळांच्या साली आणि भाज्यांच्या साली पाण्यात गरम करून घ्याव्यात. नैसर्गिक वाफ घेतल्यामुळे त्वचेच्या छिद्रांमधील घाण स्वच्छ होते आणि चेहरा उजळदार दिसतो. आज आम्ही तुम्हाला फळांच्या साली पाण्यात गरम करून वाफ घेतल्यास त्वचेला नेमके कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने वाफ घेतल्यास त्वचा आतून स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.
चेहऱ्यावर आलेले ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स घालवण्यासाठी वाफेच्या पाण्यात संत्र्याची साल सुद्धा टाकावी. पाणी गरम करून झाल्यानंतर ५ ते १० मिनिटं वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेले ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स, डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल आणि चेहरा स्वच्छ दिसेल. संत्र्याची साल त्वचेसाठी वरदान ठरते. कारण यामध्ये असलेले विटामीन सी आणि इतर आवश्यक घटक त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवतात. संत्र्याच्या सालीमधील अर्कामुळे त्वचेवरील नैसर्गिक चमक वाढते आणि चेहरा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. त्वचेतील कोलेजन उत्पादन वाढण्यासाठी आणि त्वचा अधिक घट्ट करण्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर करावा.
बीटरूटमध्ये आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरूम नष्ट करण्यासाठी पाणी गरम करताना त्यात बीटची साल टाकावी आणि पाणी गरम करावे. त्यानंतर पाण्याची वाफ घेऊन त्वचा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यावी. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. बीटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर आवश्यक पोषक घटक चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करण्यास मदत करतात. वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी आणि त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी बीटच्या पाण्याची वाफ घ्यावी.






