थंडगार बर्फाच्या पाण्यात तोंड बुडवून ठेवल्यास चेहऱ्यावर राहील फ्रेशनेस, जाणून घ्या त्वचेवर नियमित बर्फ लावण्याचे भन्नाट फायदे
वाढत्या उन्हाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये चेहऱ्याची योग्य काळजी घेतली जात नाही. कडक उन्हात बाहेर गेल्यामुळे टॅनिंग वाढते. यासोबतच तेलकट त्वचेवर सतत पिंपल्स आणि मुरुमांचे डाग येऊन त्वचा खूप जास्त खराब होऊन जाते. चेहऱ्यावरील ग्लो पूर्णपणे हरवून जातो. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण त्याऐवजी बर्फाचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यासोबतच त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. चेहऱ्यावर वाढलेला थकवा, तेलकटपणा कमी करण्यासाठी बर्फ अतिशय प्रभावी ठरेल. आपल्यातील अनेकजण चेहरा स्वच्छ करण्यासाठी बर्फाच्या थंड पाण्याचा वापर करतात. यामुळे त्वचेला भरमसाट फायदे होतात. सुरकुत्या आलेली त्वचा घट्ट होते आणि चेहऱ्यावर फ्रेशनेस वाढतो.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. बर्फाचे पाणी त्वचेवर ताजेपणा टिकवून ठेवते. यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी बर्फाच्या पाण्याच्या वापर करावा किंवा एक बर्फाचा खडा घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्यास सूज कमी होईल आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढेल. थंड पाण्याच्या वापरामुळे त्वचेवरील पोर्स तात्पुरते आकुंचन पावतात, ज्यामुळे त्वचा खूप जास्त स्मूथ दिसते. याशिवाय मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यास मेकअप व्यवस्थित टिकून राहील आणि लवकर निघून जाणार नाही.
शरीरात उष्णता वाढल्यानंतर चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि डाग येतात. हे डाग कमी करण्यासाठी चेहऱ्यावर नियमित बर्फ फिरवावा. बर्फ फिरवल्यामुळे त्वचेमध्ये थंडावा कायम टिकून राहतो आणि त्वचा फ्रेश राहण्यास मदत होते. अचानक पिंपल्स आल्यानंतर चेहऱ्यावर लालसरपणा वाढल्यास बर्फ फिरवावा. यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. जास्त वेळ जागरण करून डोळ्यांभोवती आलेली सूज कमी करण्यासाठी नियमित बर्फ लावावा. यामुळे सूज कमी होण्यासोबतच काळे डाग निघून जातील.
कडाक्याच्या उन्हाळ्यात त्वचेमध्ये वाढलेली जळजळ आणि उष्णता कमी करण्यासाठी मोठ्या वाटीमध्ये थंड पाणी किंवा बर्फाचे खडे टाकून त्यात ५ ते १० मिनिटं चेहरा बुडवून ठेवावा. यामुळे वाढलेली उष्णता कमी होते आणि चेहऱ्यावर फ्रेशनेस कायम टिकून राहतो. पण संवेदनशील त्वचा असलेल्यास बर्फाचा वापर थेट करू नये. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू शकतात. त्यामुळे कायमच कॉटनच्या कपड्यात बर्फ घेऊन नंतर तो संपूर्ण चेहऱ्यावर फिरवावा. यामुळे त्वचेला कोणतेही हानी पोहचणार नाही.






