मासिक पाळीसंबंधित काय आहेत गैरसमजुती (फोटो सौजन्य - iStock)
दरवर्षी 28 मे हा मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून पाळला जातो. मासिक पाळी महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिथे गर्भाशयाचे आवरण बाहेर पडते, ज्यामुळे महिलांमध्ये मासिक रक्तस्त्राव होतो. महिलांचे आरोग्य चांगले राखणे आणि मासिक पाळी विषयी जागरूकता वाढविण्यासाठी गैरसमजूतींना दूर करणे ही काळाची गरज आहे. डॉ. मधुलिका सिंह, वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन,पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
गैरसमज- मासिक पाळी न येणे म्हणजे ती महिला गर्भवती आहे
वास्तविकता: हे विधान चुकीचे आहे. उशिरा किंवा चुकलेली मासिक पाळी म्हणजे गर्भवती असणे असे असू शकत नाही. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस), जास्त वजन, चूकीचा आहार, आजार आणि ताण यांसारखे हार्मोनल असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. म्हणून, मासिक पाळी न येण्यामागील मूळ कारण निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का? जाणून घ्या मासिक पाळीचा आरोग्यावर होणारा परिणाम
गैरसमज: मासिक पाळीच्या वेळी महिलांनी व्यायाम करू नये
वास्तविकता: मासिक पाळीच्या वेळी व्यायाम केल्याने तुमच्या शारीरिक आरोग्याला हानी पोहोचू शकते हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा आजपर्यंत सापडलेला नाही. व्यायाम हा निरोगी शरीर आणि मनासाठी चांगला आहे आणि मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना कमी करण्यास आणि तणावमुक्त राहण्यासाठी मदत करतो.
मासिक पाळीच्या वेळी चालण्यासारख्या नियमित शारीरिक हालचालींनी कोणताही धोका उद्भवत नाही. उलट काही विशिष्ट योगासनांमुळे मासिक पाळीच्या वेळी तुम्हाला बरे वाटू शकते. मात्र व्यायाम करताना त्याचा अतिरेक करू नये. मासिक पाळीच्या वेळी कोणते व्यायाम सुरक्षितपणे करता येतील हे जाणून घेण्यासाठी तज्ञांशी चर्चा करणे गरजेचे आहे. महिलांनो, स्वतःच्या मर्जीने कोणतेही व्यायाम करू नका. फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे योग्य राहिल.
गैरसमज: मासिक पाळीच्या वेळी महिलांनी त्यांचे केस धुवू नये
वास्तविकता: मासिक पाळीच्या वेळी महिलांनी त्यांच्या स्वच्छतेशी तडजोड करू नये. मासिक पाळीच्या वेळी महिला केस धुवू शकत नाहीत किंवा आंघोळ करू शकत नाहीत असे कोणतेही पुरावे आजपर्यंत सापडलेले नाहीत. गरम पाण्याने आंघोळ केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते व आराम मिळतो. म्हणून, अशा कोणत्याही गैरसमजूतींवर विश्वास ठेवू नका.
मासिक पाळी कायमची निघून जाताना महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे
गैरसमज: मासिक पाळी अस्वच्छ (घाणेरडी) प्रक्रिया असते
वास्तविकता: मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती स्त्रीला अस्वच्छ किंवा अपवित्र ठरवत नाही. मासिक पाळी घाणेरडी असते ही समजूत चुकीची आहे. मासिक पाळी ही गर्भावस्था नसताना गर्भाशयाच्या अस्तराचे त्वचा बाहेर पडण्याचा शरीराचा नैसर्गिक मार्ग आहे. ही एक निरोगी, सामान्य अशी जैविक प्रक्रिया आहे जी प्रत्येक स्त्री अनुभवते. त्यात घाणेरडे, अपवित्र किंवा लज्जास्पद असे काहीही नाही. हे चांगल्या प्रजनन आरोग्याचे लक्षण आहे. महिलांनो, याची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याबद्दल लाज बाळगु नये.
गैरसमज: मासिक पाळीच्या वेळी महिलांनी दही, चिंच आणि लोणचे यासारखे पदार्थ टाळावेत
वास्तविकता: मासिक पाळीच्या वेळी दही किंवा लोणचे खाल्ल्याने रक्तप्रवाह थांबतो आणि स्त्रीने ते खाऊ नये असे सांगणारे कोणतेही पुरावे किंवा अभ्यास नाहीत.
गैरसमज: मासिक पाळीच्या वेळी महिलांनी अन्नाला स्पर्श केल्यास ते खराब होते
वास्तविकता: मासिक पाळीच्या वेळी महिलांना स्वयंपाकघरात प्रवेश करण्याची परवानगी नाही आणि असे मानले जाते की मासिक पाळीच्या वेळी महिलांनी अन्नाला स्पर्श केल्यास ते खराब होते. मात्र हे अतिशय चुकीचे आणि एक मोठा गैरसमज आहे जो वेळीच दूर करणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.