(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतातील पॅरिस ऑफ इंडिया दुसरे कुणाला नाही तर राजस्थानातील जयपूर या शहराला म्हटले जाते. पिंकसिटीच्या नावाने चर्चित असलेले हे ठिकाण आपला ऐतिहासिक वारसा, किल्ले आणि राजवाड्यांसाठी खास करुन ओळखला जातो. पण याला पॅरिस ऑफ इंडिया का म्हटलं जातं ते जाणून घेऊया.
उत्कृष्ट नियोजन
पॅरिस आपल्या सरळ, रुंद रस्त्यांसाठी आणि ग्रीड प्रणालीसाठी ओळखला जातो. याप्रमाणेच जयपूर देखील एक उत्तम नियोजित शहर म्हणून ओळखले जाते. १७२७ मध्ये महाराजा सवाई जयसिंह द्विती यांनी या शहराची स्थापना केली. त्यांनी बंगाली वास्तुकार विद्याधर भट्टाचार्य यांच्या सोबतीने जयपूर शहराच्या स्थापनेची प्लॅनिंग केली. भारतातील सर्वात जुन्या आणि प्लॅन्ड शहरांमध्ये जयपूरचे नाव आवर्जून घेतले जाते.
सुंदर वास्तुकला
पॅरिसची ओळख तिथल्या ऐतिहासिक इमारती आणि त्यांच्या रंगरुपामुळे होते. याबरोबरच जयपूर देखील एक असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला असेच काहीसे दृष्य दिसून येईल. १८७६ मध्ये प्रिंस ऑफ वेल्सच्या स्वागतासाठी संपूर्ण शहराला गुलाबी रंगात रंगवले गेले होते, तेव्हापासूनच सर्व ऐतिहासिक इमारतींना तोच रंग दिसून येतो. हवा महल, आमेर किला, सिटी पॅलिसे आणि जंतर-मंतरसारख्या इमारती पर्यटकांना तोच स्थापत्यकलेचा अद्भुत अनुभव देतात, जो पॅरिसमधील आयफेल टॉवर किंवा लूव्र संग्रहालयाला भेट दिल्यावर मिळतो.
आर्ट आणि कल्चरचे सेंटर
पॅरिसला जगातील आर्ट आणि फॅशन कॅपिटल मानले जाते तर जयपूर देखील भारतातील आर्ट आणि फॅशनचे सेंटर मानले जाते. हे शहर वर्षानुवर्षापासून कला, संगीत आणि हस्तकलेचे केंद्र बनले आहे. इथली लोकप्रिय ब्लू पाॅटरी, बांधणी साड्या, कुंदन आणि मीनाकारी दागिने, आणि हाताने बनवलेले ब्लॉक-प्रिंट देशभरच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत.
यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट
जयपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळेच या शहराला २०१९ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत सामील केले आहे. आपल्या या खासियतमुळेच जयपूर हे ठिकाण पॅरिस ऑफ इंडियाच्या नावाने ओळखले जाते.






