
Maharashtra Breaking News Today 21. 09.2026
21 Sep 2026 09:50 AM (IST)
West Bengal Politics: पश्चिम बंगालच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. नंदीग्राम पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या घडामोडीनंतर तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमधील जवळीक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.याच पार्श्वभूमीवर बोलताना टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी 'इंडिया' आघाडी (INDIA Alliance) राज्यात सक्रिय असल्याचे स्पष्ट केले आहे.
हुगळी येथे बोलताना खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले की, काँग्रेस आणि टीएमसीमधील 'इंडिया' आघाडी पूर्णपणे कार्यरत आहे.राहुल गांधी हे सातत्याने तृणमूल काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात असून नंदीग्रामची जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
21 Sep 2026 09:40 AM (IST)
Tata Trusts Tata Sons: टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. टाटा सन्सच्या संचालक मंडळाने (बोर्ड) एन. चंद्रशेखरन यांची चेअरमनपदावर पुढील ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी केलेली फेरनियुक्ती टाटा ट्रस्ट्सने कायदेशीर नियमांचे उल्लंघन ठरवत फेटाळून लावली आहे. टाटा सन्सच्या बोर्डाच्या बैठकीत एन. चंद्रशेखरन यांना पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा चेअरमनपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव ४-१ अशा बहुमताने मंजूर करण्यात आला होता. सर्वाधिक भागधारक असलेल्या टाटा ट्रस्ट्सने प्रसिद्धीपत्रक जारी करत या निर्णयाला आव्हान दिले आहे.
21 Sep 2026 09:30 AM (IST)
Nashik News Tree Felling: नाशिक शहरातील जाहिरात व्यवसायाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवरून महापालिका प्रशासन आणि स्थानिक जाहिरात व्यावसायिक यांच्यातील वाद अधिकच उफाळून आला आहे. एका बाजूला जाहिरात फलक (होर्डिंग) स्पष्ट दिसण्यासाठी ५० झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूला थकबाकीदार ठेकेदारांवर कारवाई न करता त्यांना पुन्हा परवानग्या दिल्याचा आरोप करत व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. गंगापूर रोड परिसरात होर्डिंग स्पष्ट दिसावे या उद्देशाने ५० झाडांची कत्तल करण्यात आली. या बेकायदेशीर कृत्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
21 Sep 2026 09:20 AM (IST)
Tukaram Mundhe Transfer: गेल्या काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आले आहे. या सुरू असलेल्या सर्व चर्चांवर अखेर तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मौन सोडले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत, एफडीएमधून बदली झाल्यानंतर पुढील काळात कोणत्या विभागात काम करायला आवडेल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना मुंढे म्हणाले, "पुढची बदली कोणत्या विभागात होईल, हे माझ्या हातात नाही. शासन जो विभाग देईल आणि जी जबाबदारी सोपवेल, तिथे मी निष्ठेने काम करेन
21 Sep 2026 09:10 AM (IST)
Maharashtra Rain Alert: गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे. वाढत्या उकाड्याने आणि उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून २४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाच्या पुनरागमनामुळे दुष्काळी स्थितीने चिंताग्रस्त असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते, मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होणार आहे.
21 Sep 2026 09:00 AM (IST)
Ganesh Visarjan Drowning: लाडक्या गणरायाला निरोप देताना महाराष्ट्रातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या आहेत. गणेश विसर्जनादरम्यान पाण्यात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मृत तरुणांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नांदेडमध्ये गणपती विसर्जन करताना इंजिनिअरिंग शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.नंदुरबार येथे विसर्जन करत असताना एका २६ वर्षीय तरुणाचा धरणातील साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
एशियन गेम्समध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक (४,७८८) धावांचा जागतिक विक्रम रचला असून, भारताने नेमबाजीत दोन रौप्य पदके पटकावली आहेत.मध्यपूर्वेतील हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाधवर केलेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १०४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने सवलतीच्या दरात घरगुती एलपीजी सिलिंडर मिळवण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (BAA) अनिवार्य केले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रायगड जिल्ह्यातील रोहा रेल्वे स्थानकाचा ५५ कोटी रुपये खर्चून कायापालट व हायटेक पुनर्विकास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.