कराडमधील एका मुलीचा अमेरिकेमध्ये अपघात वडिलांच्या व्हिसासाठी केंद्र सरकारच्या मदतीची मागणी केली जात आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
उंब्रज : कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील सहयाद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय विठ्ठल कदम यांची भाची नीलम तानाजी शिंदे हिचा अपघात अमेरिकेमध्ये शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी झाला होता. याची माहिती कुटुंबियांना रविवार १६ फेब्रुवारी रोजी समजली. प्राप्त माहितीनुसार नीलम हिची परिस्थिती नाजूक असून डोक्याला मार लागल्याने तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली आहे. याबाबतचा मेल संबधित रुग्णालयाने तातडीने कुटुंबियांना पाठविला असून नजीकच्या सदस्यांना तातडीने अमेरिकेत येण्याची सूचना केली आहे.
मुलीची अमेरिकेमध्ये मृत्यूशी झुंज सुरु असून व्हिसा मिळत नसल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांची घालमेल सुरु आहे. परंतु वडिलांना तातडीने व्हिसा मिळत नसल्याने वडगांव (उंब्रज) येथील कुटुंबियांची मुलीच्या काळजीने अवस्था बिकट झाली आहे. दरम्यान कुटुंबियांनी व्हिसा मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील याच्या माध्यमातून संपर्क साधला असून याबाबत कुटुंबाची अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळावा याबाबत धावपळ सुरू आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे मुलीची वडिलांची भेट दुरावली आहे. तर काही दिवसांपूर्वी नीलम हिच्या आईचेही निधन झाले असल्याने वडिलांची अवस्था बिकट झाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यामुळे केंद्र सरकारने याबाबत मदतीचा हात पुढे करून बाप लेकीची होणारी ताटातूट वाचवण्यासाठी पाऊलं उचलणं गरचेचे आहे. तसेच सर्वप्रकारे वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले करण्याची अपेक्षा कदम कुटुंबिय व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत अधिक पत्रकारांना माहिती देताना मुलीचे वडील तानाजी शिंदे म्हणाले, अत्यंत तातडीच्या आणि भावनिकरित्या गंभीर परिस्थितीतून हे पत्र पाठवत आहे. माझ्या मुलीचा नीलम शिंदे (वय वर्षे ३५) हिचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी गंभीर अपघात झाला असून, ती सध्या UC Davis Medical Center, Sacramento, California येथे अतिदक्षता विभागात दाखल आहे. तिची स्थिती अत्यंत नाजूक असून ती कोमामध्ये आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रुग्णालय प्रशासनाने आम्हाला तातडीने अमेरिकेत येऊन तिच्या उपचारांदरम्यान उपस्थित राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, तिची काळजी घेण्यासाठी तिथे आमच्या कुटुंबातील कोणीही नाही. आम्हाला त्वरित तिथे पोहोचण्याची गरज आहे, पण व्हिसा प्रक्रियेमध्ये होणाऱ्या विलंबामुळे आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत आहोत. यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,माजी खासदार श्रीनिवास पाटील,माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी मदतीचा हात दिला असून प्रशासकीय पातळीवर संपर्क करण्याचा प्रयत्न आहे. माझ्या नातेवाईक गौरव कदम व मला तातडीचा व्हिसा मिळावा, अशी आमची कळकळीची विनंती आहे. गेल्या ७-१० दिवसांपासून आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत, परंतु कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. रुग्णालयाने अधिकृत पत्र दिले असले तरी, ते US कौन्सुलर ऑफिस, मुंबईपर्यंत पोहोचवण्यात अडथळे येत आहेत. या संपूर्ण परिस्थितीमुळे आम्ही मानसिक व शारीरिकदृष्ट्या अत्यंत तणावाखाली आहोत. माझ्या मुलीच्या जीविताला धोका असून, तिचे वडील प्रचंड मानसिक तणावात आहेत. आम्ही आपली मदत अपेक्षित ठेवतो आणि आमच्या प्रकरणाची तातडीने दखल घेत व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा अशी विनंती केली आहे.