कल्याणातील डॉक्टर मारहाण प्रकरण; 'दोषींवर कठोर कारवाई होणार', डॉ. श्रीकांत शिंदे यांचा इशारा
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. त्यांनी म्हटले की, “कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की, रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे.”
ते पुढे म्हणाले की, डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्यावर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर,… — Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) July 8, 2026
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईसोबतच पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.”
एक लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर या दोन्ही भूमिकांमधून आपण डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले. “KDMC रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
सोमवारी एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी नवजात बाळाला उपचारासाठी एनआयसीयू (नवजात शिशु अतिदक्षता विभाग)ची गरज भासू शकते, अशी माहिती नातेवाईकांना दिली. मात्र रुग्णालयातील एनआयसीयू विभागातील सर्व बेड भरलेले असल्याने जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बाळाच्या सुरक्षिततेचा विचार करून डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
रुग्णाच्या नातेवाईकांनी याच रुग्णालयात जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मात्र जागा नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांनी शास्त्रीनगर परिसरातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. नगरसेवकांनी डॉक्टरांना फोन केला, मात्र ते रुग्णसेवेत व्यस्त असल्यामुळे फोन उचलू शकले नाहीत. त्यानंतर रात्री नगरसेवक आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांना जाब विचारला.
आरोपानुसार, कोणतीही सविस्तर विचारपूस न करता डॉ. वैभव साळुंखे आणि डॉ. सृष्टी बाविस्कर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, डॉक्टर संघटना आणि विविध वैद्यकीय संघटनांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.






