इचलकरंजी : कोल्हापूरमधील वस्त्रोद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत आता कामगार वर्गासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआय) तर्फे शहर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडून सकारात्मक परिसरात प्रतिसाद मिळत आहे. लवकरच या प्रकल्पास मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता असून कामगारांना लवकरच अत्याधुनिक उपचार मिळू शकतात. इचलकरंजी हे शहर कामगार नगरी म्हणून ओळखले जाते. येथे वस्त्रोद्योगासह विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या श्रमावर या शहराचा विकास उभा आहे. मात्र, या कामगार वर्गासाठी दर्जेदार आरोग्य सुविधांची मोठी कमतरता जाणवत होती. अपघात, व्यावसायिक आजार किंवा आकस्मिक वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना कोल्हापूरसह इतर शहरांकडे जावे लागत होते.
यामुळे वेळ आणि खर्च या दोन्ही बाबतीत कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत होता. हीच समस्या ओळखून ईएसआय आरोग्य सुविधा महामंडळाने २०२३ मध्ये इचलकरंजीत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. काही तांत्रिक कारणांमुळे तो प्रलंबित राहिला होता. मात्र, अलीकडे पुन्हा एकदा हा प्रस्ताव गतिमान झाला असून, शासनस्तरावरून सकारात्मक दृष्टिकोन मिळत आहे. आता या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळण्याच्या अंतिम टप्प्यातील प्रक्रिया सुरू असून लवकरच या रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहर आणि परिसरात सुमारे 50 हजारांहून अधिक ईएसआय कार्डधारक कामगार आहेत. औद्योगिक वसाहतींमुळे ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग इचलकरंजीत येतो. त्यामुळे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारल्यास स्थानिक कामगार व त्यांच्या कटुंबीयांना त्याचाथेट लाभ मिळू शकेल.पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल औद्योगिक प्रगतीसोबत सामाजिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने हे पाऊल ठरणार असून, ईएसआय रुग्णालयामुळे आरोग्यदायी मल्टिस्पेशालिटी इचलकरंजी औद्योगिक शहर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रुग्णालयात सर्वच सुविधा नवीन रुग्णालयात दंत, नेत्र, बालरोग, अस्थिव्यंगोपचार, स्त्रीरोग, कार्डिओलॉजी, फिजिओथेरपी अशा विविध विभागांचा समावेश असेल. अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी वैद्यकीय कर्मचारी व तत्पर सेवा यामुळे उपचारांची गुणवत्ता वाढेल. वेळेत व स्वस्त दरात उपचार मिळाल्याने कामगारांच्या कुटुंबीयांनाही मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. लवकरच या प्रकल्पास मंजुरी मिळणार असून रुग्णालयाच्या बांधकामला सुरूवात होणार आहे. यामुळे कामगारांना लवकरचं अत्याधुनिक उपचार मिळू शकणार आहेत.






