कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना ५० हजारांचा दंड; बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार
बाबल पावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, १८ जानेवारी २०२५ रोजी त्यांना कुडाळ पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी मारहाण केली होती. या घटनेविरोधात त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्ष या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
या प्रकरणात ७ जुलै २०२६ आणि २१ जुलै २०२६ रोजी आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आणि वेतनवाढ (इन्क्रिमेंट) रोखण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले.
मात्र, या निर्णयाबाबत बाबल पावस्कर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याकडून नागरिकाशी गैरवर्तन किंवा मारहाण झाल्याचा आरोप गंभीर स्वरूपाचा असताना केवळ आर्थिक दंड आणि इन्क्रिमेंट रोखण्याची शिक्षा पुरेशी नाही. संबंधित अधिकाऱ्यावर अधिक कठोर प्रशासकीय आणि शिस्तभंगाची कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बाबल पावस्कर हे चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडेही संबंधित अधिकाऱ्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बदली करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आयोगाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या पुढील कायदेशीर लढतीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पोलीस प्रशासन आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
SINDHUDURG : युवासेनेचे अनोखे ‘पेपरविक्री केंद्र’ आंदोलन, महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी






