Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 28.09.2026
Maharashtra to World Breaking News :
आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक पटकावले, तर भारतीय पुरुषांच्या कबड्डी संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले. रायगड जिल्ह्यातील महाड MIDC मध्ये भीषण स्फोट घडल्याची घटना घडली, तर भाईंदर खाडीकिनारी कृत्रिम तलावांचे उभारणी काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट, तर पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार राज्यात पावसाची काही काळ विश्रांती राहण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
28 Sep 2026 10:25 AM (IST)
शहरातील गजबजलेल्या जुना आग्रा रोडवरील मनोहर चित्रमंदिर परिसरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या धुमश्चक्रीदरम्यान संशयितांनी हवेत तब्बल चार राऊंड फायरिंग केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, जुना आग्रा रोड हा धुळे शहरातील प्रमुख आणि कायम गजबजलेला परिसर आहे. मनोहर चित्रमंदिराजवळ दोन गटांतील तरुण आमनेसामने आले. या दोन्ही गटांमध्ये मागील काही काळापासून जुना वाद सुरू असल्याची माहिती आहे. याच वादातून त्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळातच हा वाद वाढत गेला आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.
28 Sep 2026 10:15 AM (IST)
Manoj Jarange Ally Sand Mining Fine: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय कटारे यांना अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मोठा धक्का बसला असून, त्यांच्यावरील तब्बल ४ कोटी ९० लाख रुपयांचा दंड उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी कायम ठेवला आहे. गोदावरी पात्रातून सुमारे २००० ब्रास अवैध वाळूचे उत्खनन केल्याच्या आरोपावरून अजय महाराज बारस्कर यांनी केलेल्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कटारे यांना यापूर्वी तहसीलदारांनी दंडातून वगळले होते, मात्र तो आदेश रद्द करत आता उपविभागीय अधिकाऱ्यांनी या कोट्यवधींच्या दंडाच्या वसुलीचे थेट निर्देश दिले आहेत.
28 Sep 2026 10:05 AM (IST)
Panjabrao Dakh Rain Forecast: पावसाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हुलकावणी दिल्याने पिके करपून गेली असून, सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील पावसाची नेमकी स्थिती स्पष्ट केली आहे. सध्या संपूर्ण राज्यात सार्वत्रिक पावसासाठी अनुकूल परिस्थिती नसली तरी २९ आणि ३० सप्टेंबर रोजी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांसह इंदापूर, बारामती, शिर्डी, कोपरगाव, येवला व मनमाड या स्थानिक पट्ट्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
28 Sep 2026 09:55 AM (IST)
Bank Employees Strike Postponed: देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान पुकारलेला तीन दिवसांचा देशव्यापी संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात संप सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी रात्री उशिरा पार पडलेल्या बैठकीत विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून उद्यापासून २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशातील सर्व बँकांचे कामकाज नियमित व पूर्ववत सुरू राहणार आहे.
28 Sep 2026 09:45 AM (IST)
Lohagad Agrawal Death Case: लोहगडाच्या कड्यावरून केतन अग्रवाल दरीत कोसळल्याच्या प्रकरणात पोलिसांच्या हाती दोन अत्यंत महत्त्वाचे धागेदोर लागले असून, या घटनेमागील गूढ उकलण्यास मदत होत आहे. एका प्रत्यक्षदर्शीने केतनला कड्यावरून दरीत ढकलल्याचे स्पष्टपणे पाहिल्याचा दावा पोलिसांकडे दिलेल्या जबाबात केला असून, घटना पाहिल्यानंतर जाब विचारणाऱ्या या प्रत्यक्षदर्शीलाच आरोपींनी 'शांत बस, नाहीतर तुलाही किल्ल्यावरून फेकून देईन' अशी थेट जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रत्यक्षदर्शीच्या महत्त्वाच्या दाव्यासोबतच पोलिसांनी गोळा केलेल्या तब्बल १२ टीबीच्या डिजिटल डेटाच्या विश्लेषणातून या प्रकरणाशी संबंधित अनेक नवे दुवे आणि धागेदोरे उघडकीस येत आहेत.
28 Sep 2026 09:35 AM (IST)
Nagpur Police ASAI Death: नागपूर पोलीस दलातील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) रवींद्र महादेवराव कोकांडे (वय ५६) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (२७ सप्टेंबर) पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताची रात्रभर ड्युटी पूर्ण करून पहाटे साडेतीनच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. ड्युटीवरून आल्यावर लगेचच त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली; या घटनेमुळे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
28 Sep 2026 09:25 AM (IST)
Ladki Bahin Yojana Installment: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून, ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे. राज्य सरकारकडून या हप्त्यासाठी आवश्यक निधी हस्तांतरीत करण्यात आला असून, आजपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये १५०० रुपये जमा होण्यास अधिकृतपणे सुरुवात होत आहे. पुढील दोन दिवसांत हे पैसे खात्यात जमा होणार असल्याने सर्व लाभार्थी महिलांना आपल्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे की नाही हे तपासून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
28 Sep 2026 09:15 AM (IST)
Harshvardhan Sapkal : निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत राहुल गांधींवर करण्यात येणाऱ्या टीकेवरून सवाल उपस्थित केला आहे. ‘फडणवीस निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का?’ असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.
28 Sep 2026 09:05 AM (IST)
India Share Market Update: सोमवार, २८ सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजार आज लाल रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीने देखील आज सपाट ते मंद सुरुवातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आज शेअर बाजारात व्यवहार करताना सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी गुंतवणूकदारांना १०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी ५ शेअर्सची शिफारस केली आहे. सुमित बगाडिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये लॉयड्स एंटरप्रायझेस, बजाज हाउसिंग फायनान्स, बँक ऑफ महाराष्ट्र, जीएमआर एअरपोर्ट्स आणि आरबीए यांचा समावेश आहे.






