Maharashtra Breaking News Updates Today:
02 Apr 2026 11:13 AM (IST)
भोंदू अशोक खरातला काल पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्याची SIT ने मागणी केली होती. तर याच दुसऱ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
02 Apr 2026 11:05 AM (IST)
अशोक खरातची बायको कल्पना खरातचा गेल्या 2 दिवसांपासून पोलीस यंत्रणांना शोध लागत नाहीये. फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध SIT आणि शिर्डी पोलीस घेत आहेत. कल्पनाचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याने लोकेशन मिळण्यात अडचणी येत असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. खरात कुटुंबाचा देखिल आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असतांनाच SIT कडून कुटुंबावर वॉच का ठेवण्यात आला नाही ? हा देखिल प्रश्न उपस्थित होत आहे.
02 Apr 2026 10:56 AM (IST)
काठमांडू : मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक स्तरावर इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. याचा जगभरातील अनेक देशांच्या पर्यटनाला फटका बसला आहे. याची झळ हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळ(Neapl) पर्यंतही पोहोचली आहे. मार्च महिना हा नेपाळमध्ये ट्रेकिंग आणि गिर्यारोहणासाठी महत्त्वाचा सीजन मानला जातो. मात्र अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धा (US-Israel Iran War) मुळे पर्यटनाची समीकरणेच बदलली आहेत.
02 Apr 2026 10:46 AM (IST)
इराण आणि इस्रायल यांच्यातील सध्याच्या तणावाचा जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम होत आहे. काल, १ एप्रिल रोजी, बाजारात जोरदार व्यवहार झाले. सेन्सेक्स १,१८६ अंकांनी वाढून ७३,१३४ वर बंद झाला, तर निफ्टी ३४८ अंकांनी वाढून २२,६७९ वर बंद झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच राष्ट्राला उद्देशून भाषण दिले. त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याबाबत कोणतीही मोठी घोषणा केली नाही, उलट तिथे अडकलेल्या देशांना काही सल्ला दिला. ट्रम्प यांनी त्यांना युद्ध संपेपर्यंत थांबण्याचे आवाहन केले. त्यांनी असेही सांगितले की होर्मुझची सामुद्रधुनी आपोआप उघडेल आणि त्यांना हवे असलेले कोणतेही तेल अमेरिकेकडून खरेदी केले जाऊ शकते.
02 Apr 2026 10:36 AM (IST)
सोनं हा खरं तर महिलांचाच काय पण अगदी पुरुषांचाही आवडता विषय आहे. अंगावर सोनं घालायला अनेकांना आवडतं. सोन्याचे भाव कितीही वाढले तरीही त्याची खरेदी काही कमी होताना दिसत नाही. आजही गुंतवणूक म्हणून सोनं अधिक प्रमाणात खरेदी केलं जातं.
आपण सर्वजण आनंदाने दागिन्यांच्या दुकानात जातो आणि आपल्याला आवडणारे दागिने विकत घेतो. पण घरी परतल्यावर तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की “मी एवढे पैसे खर्च केले, पण दुकानदाराने किंवा सोनाराने किती नफा कमावला असेल?” आज याच प्रश्नांचं उत्तर आपण या लेखातून जाणून घेऊया की, सोनार १ ग्रॅम सोन्यावर किती नफा कमावतात.
02 Apr 2026 10:26 AM (IST)
अकोला पोलिस दलात खळबळजनक घटना पुढे आली आहे. सिव्हिल लाईन ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने (एएसआय) मंगळवारी रात्री पोलिस कोठडीतील आरोपी महिलेकडे मुलीला शरीरसुखासाठी पाठव, अशी धक्कादायक मागणी केली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन त्याला निलंबित केले. तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला
02 Apr 2026 10:16 AM (IST)
गेल्या तीन महिन्यांपासून भीषण ऊर्जा संकट, दररोज खंडित होणारा वीजपुरवठा आणि ठप्प झालेली अर्थव्यवस्था यामुळे कॅरिबियन देश क्युबा अक्षरशः अंधारात बुडाला होता. मात्र, बुधवारी क्युबाच्या मटान्झास बंदरात रशियन ध्वज असलेले ‘अनातोली कोलोडकिन’ (Anatoly Kolodkin) हे महाकाय तेलवाहू जहाज दाखल झाले आणि संपूर्ण देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. रशियाने (Russia) क्युबाला दिलेला हा मदतीचा हात केवळ व्यावसायिक करार नसून ती एक जागतिक राजकीय मैत्रीची मोठी साक्ष आहे.
02 Apr 2026 10:06 AM (IST)
मध्यपूर्वेत गेल्या ३४ दिवसांपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध (US Israel Iran War) सुरु आहे. दोन्ही गटांमधील तणाव सतत वाढतच चालला आहे. कोणीही माघार घेण्यास तयार नाही. सध्या परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी राष्ट्राला संबोधित करताना मोठे विधान केले आहे. त्यांनी आपल्या सैन्याने कौतुक करत इराणविरुद्ध विजयाची घोषणा केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
02 Apr 2026 09:30 AM (IST)
जगातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या BYD ने 2025 मध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. कंपनीचा एकूण महसूल 116 अब्ज डॉलर्सवर पोहोचला, ज्यात त्यांनी Tesla लाही मागे टाकले. जिथे टेस्लाचा महसूल अंदाजे 94.8 अब्ज डॉलर्स इतका होता, तिथे BYD ने तिला मागे टाकण्यात यश मिळवले. शिवाय, BYD ने 2.26 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली, तर टेस्लाची एकूण विक्री 1.64 दशलक्ष युनिट्स इतकी झाली. परिणामी, BYD आता जगातील सर्वात मोठी EV (इलेक्ट्रिक वाहन) कंपनी म्हणून उदयास आली आहे. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे, या प्रचंड यशानंतरही कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे.
02 Apr 2026 09:25 AM (IST)
मुंबई : केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यभर सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (सीजीडी) प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 30 जूनपर्यंत आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, असे गृहित धरून काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.राज्यात एलपीजीच्या वापरावर मर्यादा असल्याने पर्यायी इंधन म्हणून पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठा वाढवण्यावर शासनाचा भर आहे. त्यासाठी विविध परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, २४ तासांच्या आत परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, पीएनजी प्रकल्पांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परवानगीची अट रद्द करण्यात आली असून, विविध शुल्कही माफ करण्यात आले आहेत.
02 Apr 2026 09:20 AM (IST)
वॉशिंग्टन : तब्बल 54 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने मानवाचा प्रवास सुरु झाला आहे. नासाची पहिली मानवी मोहीम आर्टेमिस-II गुरुवारी भारतीय वेळेनुसार पहाटे ४:०५ वाजता फ्लोरिडामधून यशस्वीरित्या प्रक्षेपित झाली. एसएलएस (SLS) रॉकेटमध्ये क्रिस्टीना कोच, व्हिक्टर ग्लोव्हर, रीड वाईजमन आणि जेरेमी हॅन्सन हे अंतराळवीर होते. हा 10 दिवसांचा प्रवास अंतराळवीरांना पृथ्वीपासून अंदाजे ४०६००० किलोमीटर दूर घेऊन जाईल, जो आतापर्यंतचा सर्वात लांब मानवी अंतराळ प्रवास ठरेल. आर्टेमिस-II मोहीम अंतराळवीरांना चंद्राच्या जवळ घेऊन जाईल, परंतु ते चंद्रावर उतरणार नाहीत. ही एक चाचणी मोहीम आहे, ज्याचा उद्देश भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि क्षमता तपासणे आहे.
02 Apr 2026 09:20 AM (IST)
LSG vs DC IPL 2026 Live Updates: आज लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले होते. लखनौने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 143 धावा केल्या. त्यानंतर 144 धावांचा पाठलाग (IPL 2026) करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरला. मात्र मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद केले. दिल्ली कॅपिटल्सने लखनौवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.
02 Apr 2026 09:16 AM (IST)
वाशिम : कन्याभ्रूणहत्या आणि बिघडते लिंग गुणोत्तर हा समाजासमोरील गंभीर प्रश्न लक्षात घेऊन वाशिम जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि लिंग निवडीस आळा घालण्यासाठी माहिती देणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून, खात्रीशीर माहिती देणाऱ्या व्यक्तीस १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारी ही योजना गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (PCPNDT) कायदा तसेच वैद्यकीय गर्भपात (MTP) कायद्यांतर्गत बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवली जात आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित माहितीदारास बक्षीस दिले जाणार असून, त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे.
02 Apr 2026 09:12 AM (IST)
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. तो एकापाठोपाठ एक चित्रपटांद्वारे मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचे नाव सौरव गांगुलीच्या बायोपिकशीही जोडले गेले होते. या चित्रपटाबाबत अनेक नवीन माहिती समोर आली आहे. या सगळ्यातच, आता सौरव गांगुलीच्या बायोपिकबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीने चित्रपटाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. आता सौरव गांगुलीच्या बायोपिकला शीर्षक मिळाले आहे.
02 Apr 2026 09:09 AM (IST)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, त्यात त्रुटी राहिल्याने अनुदान बंद झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या त्रुटी दुरूस्त करण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी मुदतवाढ दिली गेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी लाभार्थीना 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत होती. मात्र, अनेक जणींचे ई-केवायसी पूर्ण न झाल्याने सरकारने ही मुदत एक महिन्याने वाढवण्याचा निर्णय घेतला.
Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे
Indonesia Earthquake : आज सकाळी जेव्हा जग नुकतेच जागे होत होते, तेव्हा इंडोनेशियातील (Indonesia) मोलुक्का समुद्राच्या परिसरात निसर्गाचे एक भीषण रूप पाहायला मिळाले. एका शक्तिशाली भूकंपाने केवळ जमीनच हादरवली नाही, तर हजारो लोकांच्या मनात धडकी भरवली आहे. रिश्टर स्केलवर ७.४ इतकी प्रचंड तीव्रता असलेल्या या भूकंपाने इंडोनेशियाच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा धोका निर्माण केला असून प्रशासनाने तातडीचा इशारा जारी केला आहे. वाचा सविस्तर –






