Maharashtra Heat Wave: विदर्भात उष्णतेची लाट; मुंबई-ठाण्यासह कोकणाला 'येलो अलर्ट, ' पुढील २ दिवस महत्त्वाचे
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान आहे. कोकणात दमट हवामान राहण्याची शक्यता असून दिवसभर तापमानात चढ-उतार पाहायला मिळतील. राज्यात खऱ्या अर्थाने कडाक्याच्या उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये तापमान सातत्याने वाढत आहे, या जिल्हह्यांत कमाल तापमान ३६ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे. पुढील आठवडचातही तापमान वाढण्याची शक्यता कायम आहे.
मराठवाड्याच्या अनेक भागांत मार्चमध्येच तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भ क्षेत्रात उष्णतेची लाट सर्वाधिक तीव्र झाली आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांत तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सोमवारी तापमान ३८ ते ४१ अशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Weather Forecast)
हवामान विभागानुसार, राज्याध्या कोणत्याही भागात पावसाची शक्यता नाही. येत्या काही दिवसांत कमाल तापमानात आणखी २ ते ३ अंशांची वाढ होऊ शकते, भीषण उष्णता पाहता नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तसेच जास्तीत जास्त पाणी विम्याचे आणि शरीर हज्यड्रेट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१. हायड्रेशन: दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. लिंबू सरबत किंवा ताकाचा वापर वाढवा.
२. वेळ: दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
३. पोशाख: हलक्या रंगाचे आणि सुती कपडे वापरा. बाहेर पडताना डोके झाकून ठेवा.
४. विशेष काळजी: लहान मुले, वृद्ध आणि दीर्घकाळ आजारी असलेल्या व्यक्तींनी उन्हात जाणे टाळावे.
हवामान तज्ज्ञांचे मत: अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकणात आर्द्रता वाढली आहे, तर उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा कडाका वाढला आहे. १२ मार्चनंतर काही भागांत अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.






