राज्यात कडाक्याची थंडी; तापमानात चढ-उतार कायम
राज्यात तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या पावसामुळे अनेक भागांत वातावरण ढगाळ झाले असून सकाळी व रात्री हवेत गारवा, धुके आणि दव जाणवत आहे. हवामान खात्यानुसार आजही तापमानात चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत गारठा वाढला आहे. काल परभणी येथे किमान तापमान ६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. निफाड येथे ७ अंश, धुळे येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच पुणे, नाशिक, जेऊर, भंडारा आणि गोंदिया येथे १० अंश सेल्सिअस व त्यापेक्षा कमी तापमान नोंदवले गेले. आज राज्यातील बहुतांश भागांत अंशतः ढगाळ वातावरण असून गारठा कायम राहणार आहे. तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

