Sharad Pawar News: पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण...; स्वातंत्र्यलढ्यातील नेहरू-इंदिरा गांधींच्या योगदानावरून शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी होणाऱ्या तुलनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “स्वातंत्र्यलढ्यातील नेहरूंचा संघर्ष, तुरुंगवास आणि देशनिर्मितीतील भूमिका कधीही विसरता येणार नाही. तसेच देशाची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा वाढवण्यात इंदिरा गांधींचेही मोठे योगदान आहे. असं शरद पवार यांनी सांगितलं.
“आज देशासमोरील बेरोजगारी, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याकांच्या अनेक गंभीर समस्या आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांबाबत, त्यांच्या समस्यांबाबत किती आस्था आहे, यावर भाष्य न केलेलेच बरे,” असा टोला त्यांनी लगावला. काही जणांकडून इतिहास पुण्याचा प्रयत्न होत आहे. पण त स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि काँग्रेसच्या योगदानाचे महत्त्व कमी करू शकत नाही, असंही त्यांनी नमुद केलं.
शरद पवार म्हणाले, “देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले म्हणून त्यांचा गौरव होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण जवाहरलाल नेहरूंचे कार्य आणि कर्तृत्व यांची तुलना इतर कोणाशी करता येईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. नेहरू पंतप्रधान झाले तो काळ देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा होता. तो काळ अनेक अडचणी, आव्हाने आणि संघर्षांनी भरलेला होत. पंतप्रधान मोदींची नेहरूंशी तुलना करणे योग्य नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चा २७ वा वर्धापन दिन आज राज्यभर उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेतले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत पक्षाच्या स्थापनेपासूनच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा गौरव केला. तसेच पक्षाच्या वैचारिक भूमिकेचा पुनरुच्चार करत जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी नमूद केले की, १० जून १९९९ रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ पक्षाने देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत सक्रिय योगदान दिले आहे. सुळे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या विचाराचा उल्लेख करत, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची पक्षाची परंपरा कायम असल्याचे सांगितले.






