खासदार श्रीकांत शिंदेंचा नाशिकमध्ये 'शिवसंवाद' (Photo Credit- X)
📍शिवसंवाद दौरा – चांदवड आणि निफाड विधानसभा बैठक नाशिक येथून सुरू झालेल्या राज्यव्यापी ‘शिवसंवाद दौऱ्या’ अंतर्गत आज चांदवड आणि निफाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच स्थानिक शिवसैनिकांसोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत… pic.twitter.com/GpBPVbT82N — Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) May 21, 2026
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, निफाड आणि चांदवडमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवडणूक आयोगाकडून लवकरच मतदार यादी पुनरीक्षण मोहीम राबवली जाईल, त्यासाठी पक्ष बूथ लेव्हल एजंटची नेमणूक करत आहे. शिवसेना मतदार यादी पुनरीक्षण मोहीमेबाबत गंभीर असून पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने बीएलए नियुक्ती आणि प्रशिक्षणाचे काम पक्षाकडून हाती घेण्यात आल्याचे ते खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
ओबीसी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर गेल्याने नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. महापालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळाले होते. त्यामुळे राज्यातील उर्वरित जिल्हा परिषद निवडणुकांवर पक्षाने लक्ष केंद्रीत केल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. शिवसंवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात नाशिकमधील विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Shrikant Shinde : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज; राज्यभर 288 मतदारसंघांत BLA नियुक्तीवर भर
या आठवड्याच्या सुरुवातीला खासदार डॉ. शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि देवळाली या विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर आणि इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर खासदार डॉ. शिंदे यांनी नाशिक दौऱ्यात ईलेक्ट्रिक वाहने वापरली होती. आज दुसऱ्यांदा नाशिक जिल्ह्याचा दौरा करताना वाहनांचा ताफा बाजूला ठेवत खासदार डॉ. शिंदे यांनी मुंबई ते नाशिक असा वंदे भारत ट्रेनने प्रवास करत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे राज्याचा दौरा करणार आहेत. मे, जून आणि जुलै असे तीन महिने खासदार डॉ. शिंदे ग्रामीण महाराष्ट्र पिंजून काढतील. यात १०० विधानसभा मतदार संघ आणि २२ जिल्ह्यांमध्ये खासदार डॉ. शिंदे यांचा शिवसंवाद दौरा असेल, असे पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात खासदार डॉ. शिंदे यांनी नाशिकमधील चार विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला.






