Raigad News: 'म्युल अकाऊंट' धारकांवर रायगड पोलिसांची धडक कारवाई; ३५ कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश
Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही
सायबर गुन्हेगार गुंतवणुकीवरील मोठा परतावा, अर्धवेळ नोकरी, डिजिटल अटक, शेअर मार्केट आणि विविध ऑनलाइन आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करतात. फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वतःच्या खात्यात न ठेवता इतरांच्या बँक खात्यांचा वापर करून व्यवहार केली जाते. अशा खात्यांना ‘म्युल अकाऊंट’ म्हटले जाते. खातेधारकांकडून पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक व इतर बँकिंग माहिती घेऊन त्यांचा वापर सायबर गुन्ह्यांतील पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
एनसीआरपी पोर्टलवरील तक्रारी, आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांचा मागोवा आणि बँक व्यवहारांच्या विश्लेषणातून अनेक संशयास्पद खात्यांचा शोध घेण्यात आला. या खात्यांमध्ये मागील काही महिन्यांत लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात स्वतःची बँक खाती इतरांना वापरण्यास दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित म्युल अकाऊंट धारकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. २७ जुलै २०२६ पर्यंत अशा २३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व म्युल अकाऊंट धारकांविरोधात कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सायबर पोलीस ठाण्यासह श्रीवर्धन, अलिबाग, रोहा, नागोठणे, कर्जत, रसायनी, माणगाव, खोपोली, पोयनाड, पेण आणि कोलाड पोलीस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हे नोंदविण्यात आले असून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. या प्रकरणांतील म्युल अकाऊंट धारकांचे बँक स्टेटमेंट आणि व्यवहारांची तपासणी सुरू असून जिल्ह्याबाहेरील तसेच राज्यातील इतर गुन्ह्यांशी त्यांचा संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, या सायबर फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला २४ जुलै रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रायगड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, सिमकार्ड किंवा वैयक्तिक कागदपत्रे वापरण्यास देऊ नयेत. अशा प्रकारे आपले खाते किंवा कागदपत्रांचा वापर सायबर फसवणुकीसाठी झाल्यास संबंधित व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्यासह श्रीवर्धन, अलिबाग, रोहा, कर्जत, रसायनी, माणगाव, खोपोली, पोयनाड, पेण व नागोठणे पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि विशेष तपास पथकाने संयुक्तपणे तपासाची धुरा सांभाळली असून सायबर फसवणूक रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.






