संग्रहित फोटो
पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जून २०२६ पासून भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. मंदिर परिसरातील नवीन सभामंडप आणि पायरीमार्गाच्या उभारणीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १५ ते ३० जून या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल. ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांनी वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक राहणार आहे.
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर परिसरात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी देवस्थान ट्रस्टने ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ही मुदत ३१ मे २०२६ पर्यंत वाढविण्यात आली होती. मुख्य मंदिरासमोरील भव्य सभामंडपाचे काम सामान्यतः पूर्ण होण्यासाठी सुमारे एक वर्ष लागण्याची अपेक्षा होती. मात्र, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्यामुळे तसेच रात्रंदिवस सुरू असलेल्या कामामुळे हे प्रकल्प केवळ पाच महिन्यांत पूर्णत्वास येत आहे.
मुख्य सभामंडपाचे बांधकाम ३१ मेपर्यंत पूर्ण होणार असून दर्शनबारी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाशी संबंधित कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. उर्वरित किरकोळ कामे पूर्ण करून बांधकाम साहित्य व यंत्रसामग्री हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. देवस्थान ट्रस्टने जाहीर केलेल्या नियोजनानुसार ५ जून २०२६ पासून दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. दररोज १,००० भाविकांना प्रवेश दिला जाणार असून नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध राहील. १५ ते ३० जून या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल. ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांनी वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक राहणार आहे. भाविक, स्थानिक नागरिक तसेच सर्व संबंधितांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.






