सिल्लोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २१ गावांना टँकरचे चटके
तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही एप्रिल महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तर मे महिन्यात टँकरचे प्रस्ताव वाढले आहे. आमठाणा, केळगाव, गोळेगाव, अंभई, उंडणगाव, जांभई, चारनेर, घाटनांद्रा या परिसरात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यामुळे एप्रिल- मे महिन्यात अवैध पाणी उपसा केला जातो. केळगावसह तालुक्यातील इतर प्रकल्पातून देखील अवैध पाणी उपसा केला जात असून महावितरण व लघु पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. वेळीच लक्ष न दिल्यास तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाल्याने गुरुवारी अचानक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सहायक गटविकास अधिकारी अक्षय म्हस्के यांनी केळगाव लघु प्रकल्पाला भेट दिली. यावेळी प्रकल्पातून शंभराहून आधिक विद्युत मोटारीने अवैध पाणी उपसा केला जात असल्याचे समोर आले. अवैध पाणी उपशा मुळे प्रकल्पाने तळ गाठला असून प्रकल्पातील मासे तडफडून मेल्याने पाणी दूषित झाले. या प्रकल्पावर केळगाव, जांभई, अंभई गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.
दरम्यान तालुक्यातील वांगी बु., चिंचवण, वरुड खुर्द, पिंप्री, बोदवड, सराटी, बोजगाव, मोढा खुर्द, वडोदवाथा, तलवाडा, आसडी, वडोदचाथा वस्ती, वरखेडी-भायगाव, पिरोळा- डोईफोडा, गव्हाली, वडाळा, विरगाव, रेलगाव परदेशीवाडी, पिंपळदरी, धावडा, जुनापानेवाडी या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तर अंभई, जांभई गावांचे टँकरचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे.
एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे तालुक्यातील केळगाव लघु प्रकल्पातून सर्रास अवैध पाणी उपसा सुरु असल्याचे वृत्त दै. नवराष्ट्र ने १९ मे रोजी प्रसिद्ध केले होते. अवैध पाणी उपशामुळे तलावाने तळ गाठला असून हे चित्र गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या पाहणीत समोर आले आहे. दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी महावितरण, लघु पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करीत अवैध पाणी उपसा तातडीने बंद केला.






