सौजन्य - नवराष्ट्र टीम
सुरवसे-पाटील यांनी एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना लेखी निवेदन देऊन सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत उर्वरित बसमध्येही ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. सध्या पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ३० ते ३५ टक्के बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याचे सुरवसे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बसमधील गुन्हेगारी घटनांमध्ये आरोपींची ओळख पटविणे आणि पुरावे गोळा करणे कठीण जात होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत महिलांशी गैरवर्तनाच्या घटना घडत असून, पुराव्याअभावी कारवाईत अडचणी येत होत्या.
सध्या वातानुकूलित तसेच नव्याने दाखल झालेल्या बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध आहे. आता उर्वरित जुन्या बसमध्येही टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच बसमधील सीसीटीव्ही फुटेजचे प्रभावी निरीक्षण व देखरेख करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळ भूसंपादन प्रक्रियेत अधिकाऱ्यांची मनमानी; शेतकऱ्यांची बँक खाती गोठवली
व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याबद्दल सुरवसे-पाटील यांनी त्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे बसमधील विनयभंग, चोरी आणि इतर गैरप्रकारांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केला.






