Raigad News: महाडमध्ये दूषित पाण्याचा कहर! पानसरे मोहल्ल्यात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण
या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार महाड नगरपरिषदेकडे तक्रारी दाखल केल्या असून दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठीही प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. मात्र प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या प्रकरणी महाड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित भोईर याव्याशी संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती दिली. सध्या संबंधित भागातील नागरिकांना टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जात असून त्याचे अधिक प्रभावी नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठाही अत्यंत कमी वेळेसाठी होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. पूर्वी अर्धा ते एक तास सुरू राहणारा पाणीपुरवठा आता अत्यल्य वेळेसाठी होत असल्याने पाणी साठविणेही कठीण बनले आहे. दरम्यान, या भागातील नागरिकांना गेल्या एक ते दोन वर्षांपासून पाणीपुरवठ्याबाबतच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही समोर आले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे प्रशासकीय राजवट संपल्यानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांकडूनही या समस्येची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दूषित पाणीपुरवठ्याचे मूळ कारण जलवाहिनीच्या मध्यंतरातील गळती असू शकते, काही ठिकाणी नाला किंवा अन्य भागाजवळ जलवाहिनी फुटल्याने दूषित पाणी मिसळत असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. संपूर्ण जलवाहिनीची तपासणी सुरू आहे. तपासणी पूर्ण होताच नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. – रोहित भोईर, अभियंता, पाणीपुरवठा विभाग






