Photo Credit : Social Media
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची गुरुवारी (१८ जुलै) बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या प्रभारी-सहप्रभारी आणि जवळपास 30 बड्या नेत्यांमध्ये तीन तास बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने भाजप नेत्यांमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर प्रचंड नाराजीचा सूर दिसून आला. त्यामुळे वरवर महायुतीत सर्व काही आलबेल आहे असे बोलले जात असले तरी महायुतीत अंतर्गत मतभेद असल्याचेही या बैठकीतून दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चुकांसदर्भात या बैठकीत निष्कर्ष काढण्यात आले. यानुसार, महायुतीत लोकसभेला शेवटपर्यंत जागावाटप न झाल्याने महायुतीला फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागावाटप लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी भाजप नेत्यांनी यावेळी केली. तसेच, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी अपेक्षित मदत न केली नाही. राष्ट्रवादीचे नेते महाविकास आघाडीला मदत करत होते. अशीही तक्रार भाजप नेत्यांनी या बैठकीत केली.
याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला १५ जागा देण्याची काहीच गरज नव्हती. शिंदे गटाच्या नेत्यांनी काही मतदारसंघात भाजपला साथ दिली नाही. जालना आणि पालघर जिल्ह्यात शिंदे गटाच्या नेत्यांन भाजपला साथ दिली नाही.असाही सूर या बैठकीत भाजप नेत्यांनी आळवला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्थानिक पातळीवर आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार दिला गेला नाही. महत्त्वाचे विषयाचे निर्णय़ही दिल्लीतून होत होते. वेळेत निर्णय न घेता आल्याने लोकसभा निवडणुकीत फटका बसला. असेही एका नेत्याने या बैठकीत सुचवल्याची माहिती आहे.